बांधकाम व भरावामुळे जाण्या-येण्याचा मार्ग बंद
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सातघर येथे शेतावर जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता पुर्वपरंपरागत चालू होता. परंतु त्याच रस्त्यावर सिमेंटचे बांधकाम व भराव करून हा रस्ताच बंद करण्यात आला आहे. पेढांबेचे सरपंच यांच्या सुपूत्राने दादागिरी करीत हा प्रताप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भराव व बांधकामामुळे बाजूच्या गावाना पुराचा धोका निर्माण होण्याबरोबरच शेतावर जाण्या येण्याच्या मार्गाला अडथळा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम परिसरातील शेकडो एकर जमीन नापिक होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार करूनही अजूनपर्यंत कार्यवाही करण्यात आली नसल्याचे ही शेतकरी, ग्रामस्थांनी सांगितले.

सातघर येथील असंख्य ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गावालगत गट नं. 47 मधून वाहणारा ओढा आहे. ओेढ्याच्या बाजूलाच असंख्य
शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. ओढ्याच्या जागेमधून पुर्वापार शेतावर जाण्याच्या पायवाटेचा रस्ता आह. या जागेशी पेढांबेच्या सरपंचांचे सुपूत्र रोहित पाटील तसेच पती रविंद्र पाटील यांचा काहीही संबंध नाही. तरीदेखील या वहिवाटीच्या जागेत भराव टाकून सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले आहे. रात्रीच्यावेळी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पावसाळ्यात बांधकामामुळे पावसाचे पाणी या ओढ्यात मोठ्या प्रमाणात साचत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढून शेताकडे जाण्याचा अडथळा निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर बांधकामामुळे नांगर, व इतर शेती अवजारांची शेतावर ने-आण करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच, डोंगर भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे शेत जमीनींना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतावर जाण्याचा मार्गच बंद झाल्याचा फटका देखील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे रोहित पाटील व रविंद्र पाटील यांच्याविरोधात कारवाई करून बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात यावे, अशी मागणी सातघर ग्रामस्थांनी केली आहे. त्याबाबत अलिबाग तहसील कार्यालयासह पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तक्रारकरून एक महिना होत आला आहे. तरीदेखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
तक्रार अर्ज गहाळ झाल्याचा आरोप
पेढांब्याच्या सरपंच यांच्या सुपूत्राने वहिवाटीचा रस्ता बंद करून शेतकरी, ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान केले आहे. याविरोधात न्याय मिळण्यासाठी अलिबाग तहसील कार्यालयात अर्ज करण्यात आला. परंतु तक्रार अर्जच तहसील कार्यालयाकडून गहाळ झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे अर्ज गहाळ होण्यामागे नक्की कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून तहसील कार्यालयाच्या या कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अलिबागच्या तहसीलदारांचे तक्रारीकडे दुर्लक्ष
सातघर गावापासून काही अंतरावर अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी आहेत. गावालगत असलेल्या पुर्वपरंपरागत नाल्याच्या बाजूनेच शेतावर जाण्या-येण्याचा मार्ग आहे. मात्र, रोहित पाटील यांनी या ठिकाणी बेकायदेशीररित्या बांधकाम व भराव करून वहिवाटीचा रस्ताच बंद केला आहे. त्याबाबत अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज केला. तलाठी, सर्कल यांना पाठवून कार्यवाही करणार, असे आश्वासनही दिले. मात्र, गेल्या अनेकदिवसांपासून कोणीही सरकारी कर्मचारी या जागेवर फिरकला नाही. अलिबागच्या तहसीलदारांचे तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रोहित पाटीलचा मनमानी कारभार
पेंढाबे ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी पंधरा दिवसांपुर्वी एका व्यावसायिकांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाडी उभी करून रस्ता अडवला होता. याप्रकरणी रोहित पाटील यांच्या विरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. आपल्या आईच्या सरपंचपदाचा गैरफायदा घेत रोहित पाटील ठिकठिकाणी दादागिरी करीत असल्याची चर्चा आहे. तंटामुक्ती अध्यक्षपद त्यांच्यात घरात असतानाही तंटामुक्त करण्याऐवजी तंटा वाढविण्यास रोहित भर देत असल्याचे तेथील स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. रोहित पाटील याच्या मनमानी कारभाराबाबाबत तीव्र संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्यामध्ये जो पारंपारिक ओढा वाहतो तो रोहित पाटील यांनी बंद केला आहे. या ओढ्यात डोंगरभागातील तिन्ही बाजूने पाहणी येते. त्यामुळे या आढ्याला नदीचे स्वरुप प्राप्त होते. या ओढ्याची रुंदी बांधकाम करून कमी केली आहे. त्यामुळे पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, जाण्या-येण्याची मोठी गैरसोय होत आहे. ही मिळकत हर्षल पाटील (राम पाटील) यांच्या मालकीची आहे. सातघर ग्रामस्थांच्या वहिवासाठी अनेक वर्षे त्यांनी ही जागा ठेवली आहे. रोहित पाटील यांनी त्यांच्या मिळकतीमध्ये जाण्यासाठी ओढ्याच्या ठिकाणी बांधकाम करून नुकसान केले आहे.
– दिपक पाटील, अठरा गाव समिती अध्यक्ष
सातघरमधील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याची माहिती येथील ग्रामस्थ दिपक पाटील यांच्याकडून प्राप्त झाली. सबंधितांना पत्र देऊन सोमवारी अथवा मंगळवारी जागेवर जाऊन पाहणी करून अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठविला जाईल.
– रिना म्हात्रे, तलाठी
सातघर गावाजवळ असलेल्या नाल्याजवळूनच शेताकडे जाण्याचा रस्ता आहे. हा वहिवाटीचा रस्ता पुर्वपरंपरागत आहे. मात्र, हा रस्ताच रोहित पाटील यांनी दादागिरी करून बंद केला आहे. अनधिकृतरित्या बांधकाम, भराव टाकून वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचा फटका शेतकरी, ग्रामस्थांना बसला आहे. शेतावर जाण्यास अडथळे निर्माण होत आहे. शेतीची अवजारेदेखील येथून नेता येत नाही. याबाबत तहसीलदारांसह पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. परंतु, अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
– प्रकाश पाटील, ग्रामस्थ व पंच






