तळा बाजारपेठेत ठेकेदाराकडून रस्त्यावर अतिक्रमण

रस्ता अरुंद झाल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडी
| तळा | वार्ताहर |

तळा बाजारपेठेत करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे नागरिकांना फायदा होण्याऐवजी विविध समस्यांनाच सामोरे जावे लागत आहे. तळा बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडले तर काही ठिकाणी रस्त्याची खडी निघाल्याचे चित्र पहायला मिळाले. एवढेच नव्हे तर, बाजारपेठेत मच्छीमार्केट शेजारी असलेल्या नगरपंचायतीच्या गाळ्यांसमोर संबंधित ठेकेदाराकडून वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे येथील रस्ता अरुंद झाला असून, ठेकेदाराच्या या गलथान कामामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.

नगरपंचायतीच्या गाळ्यांसमोर रस्त्याची लेव्हल चुकल्याने पाणी तुंबून राहू लागले. या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी संबंधित ठेकेदाराने आपली नको ती अक्कल लढवून वाढीव बांधकाम करून गाळेधारकांसाठी पायरी काढून दिली. यामुळे पाणी तुंबण्याची समस्या तर सुटली नाहीच, मात्र रस्ता अरुंद झाल्यामुळे नव्याने वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवू लागली आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी येत असल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेला रस्ता अद्यापही बुजविण्यात आला नसल्याने चाकरमान्यांसह येथील व्यापार्‍यांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या गाळ्यांसमोर करण्यात आलेले वाढीव बांधकाम त्वरित हटविण्यात यावे तसेच पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेला रस्तादेखील बुजविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version