श्रीवर्धनमध्ये दुकानदारांचे रस्त्यावर अतिक्रमण

नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
। श्रीवर्धन । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुका सध्या पर्यटनाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आहे. तालुक्यातील दिवेआगर येथे असलेले सुवर्ण गणेश मंदिर व हरिहरेश्‍वर येथील काळभैरव योगेश्‍वरी तसेच हरिहरेश्‍वर मंदिर यांना भेट देण्यासाठी भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. येणारे सर्व पर्यटक आवर्जून समुद्र किनारा पाहण्यासाठी येत असतात. मात्र शहरातील रस्ते अत्यंत अरुंद असल्याने पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा अनेक वेळा लागलेल्या पाहायला मिळतात. रस्ते अरुंद असून सुद्धा बाजारपेठेमधील अनेक दुकानदार, भाजीविक्रेते रस्त्यावरती तीन ते चार फूट जागेवरती आपला माल ठेवून अतिक्रमण करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच शहरात दुचाकी पार्किंगचा प्रश्‍न देखील अत्यंत गंभीर बनलेला आहे. अनेक दुचाकीस्वार आपल्या दुचाकी रस्त्याच्या बाजूला वेड्यावाकड्या उभ्या करून ठेवत असल्यामुळे देखील वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. या अगोदर वाहतूक पोलिसांकडून बाजारपेठेत वेड्यावाकड्या उभ्या केलेल्या दुचाकीस्वारांवरती कारवाई करण्यात येत होती. परंतु मागील दोन वर्षांपासून येथे एकच वाहतूक पोलीस तैनात असल्यामुळे वाहतूक पोलिसांचे देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा बाजारपेठेतून जात असताना दोन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे देखील लागतात. तरी नगरपरिषदेने अतिक्रमण करणार्‍या दुकानदार व भाजी विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Exit mobile version