जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांत अधिकाऱ्यांचे फोन बंद; पोहोच रस्त्याच्या भरावाला सुरुवात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील धेरंड शहापूर येथील प्रस्तावित सिनारमास प्रकल्पाचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सीमांकन करण्याची प्रक्रिया सुरु केली. मात्र, स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन तोडगा काढण्याचा पर्याय उपस्थित अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार 21 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. असे असतानाही दुसऱ्याच दिवशी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करीत पोहोच रस्त्याच्या भरावाला सुरुवात केली. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी विरोध दर्शविताच त्यांना बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी फोन बंद ठेवून बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी प्रशासन बळाचा वापर करुन शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वास्तव शनिवारी (दि.15) समोर आले.

धेरंड शहापूर परिसरात सिनारमास प्रकल्प येत आहे. सर्व्हे नं. 264, 265 मधील औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्याच्या कामाबाबत सीमांकन करण्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी (दि.14) शहापूर परिसरात दाखल झाले होते. सीमांकनाव्यतिरिक्त काहीही करू नये, असे सांगूनही अधिकारी पोलिसांच्या बळाचा वापर करीत मनमानी कारभार करीत होते. संतप्त शेतकऱ्यांनी भरावाला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर तूर्तास लढा थांबविण्यात आला. मात्र, शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेसीबीसह माती, खडीने भरलेले ट्रक घेऊन एमआयडीसीचे अधिकारी आले. त्यांनी भरावाला सुरुवात केली. त्यावेळी ग्रामस्थांनी या भरावाला तीव्र विरोध केला. ग्रामस्थांच्या या विरोधाची पर्वा न करता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांंवर पोलीस बळाचा वापर करीत भरावाचे काम सुरूच ठेवले. या कामाच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला. त्यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चकमक झाली. परिस्थिती ताणतणावाची होऊ नये, म्हणून पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेऊन पोयनाड पोलीस ठाण्यात हलविले. त्यानंतर प्रशासनाने रस्त्याचे काम पुढे सुरू ठेवले. यावेळी ग्रामस्थांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांचे फोनच बंद होते. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप तीव्र झाला. सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरूच होता. प्रकल्पाला विरोध नाही; मात्र जमिनीचा दर, पुनर्वसनाच्या अटी आणि भरपाई याबाबत समाधानकारक निर्णय व चर्चा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. योग्य चर्चा न करता आणि मागण्या मान्य न करता हा रस्त्याचा भराव सुरू करणे चुकीचे आहे. प्रशासनाने प्रथम संवाद साधावा, त्यानंतरच कामाला सुरुवात करावी, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
ग्रामस्थांना योग्य दर, पुनर्वसनाची हमी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी जबरदस्तीने काम सुरू करण्याचा प्रयत्न हा जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. त्यांनी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ग्रामस्थ, शेतकऱ्यांची तटस्थ भूमिका आणि पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मध्यस्थीने भरावाचे काम थांबविण्यात आले. भराव करणारे जेसीबी हटविण्यात आले. परंतु, परिस्थिती नियंत्रणात असली तरीदेखील परिसरात तणावाचे वातावरण कायम होते.
उपरे नको, स्थानिकांना घ्या
सिनारमास प्रकल्पापर्यंत पोहोच रस्ता करण्यासाठी एमआयडीसीद्वारे भरावाचे काम एका बाहेरील ठेकेदाराला देण्यात आले. स्थानिकांना विश्वासात न घेता, काम सुरु केल्याने संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी उपरे नको, स्थानिकांना रोजगार द्या, अशी मागणी केली.
शहापूरमध्ये संतापाची लाट
पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थांचे आंदोलन मोडीत काढण्याचा घाट एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घातला. त्यावेळी ग्रामस्थ, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. शहापूर परिसरात संतापाची लाट उसळली होती. मागण्या जोपर्यंत मान्य करीत नाहीत, बैठक घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
गावाला छावणीचे स्वरूप
दोन दिवसांपासून शहापूर परिसरात दोनशेहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवार व शनिवारी असे दोन दिवस शहापूर परिसरात पोलीस आहेत. त्यामुळे या गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
आज होणार पंचनामा
पोहोच रस्त्याच्या कामासाठी भराव करण्यात आला होता. काही माती, खडीचा भराव करण्याबरोबरच जेएसडब्ल्यू कंपनीतील स्लॅग (टाकाऊ खडी) देखील टाकण्यात आली. या भरावामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले. शेततळ्याची हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रविवारी (दि.16) सकाळी दहा वाजता पंचनामा होणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी भानुदास यादव यांनी दिली.
बाधित क्षेत्राची जयंत पाटील यांच्याकडून पाहणी
धेरंड-शहापूर येथील सिनारमास प्रकल्पापर्यंत पोहोच रस्ता करण्यासाठी प्रशासनाने मनमानी कारभार सुरु केला. ही माहिती शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या लक्षात आल्यावर शनिवारी सकाळी त्यांनी शहापूर येथे जाऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली.
जिल्हाधिकारी झोपले; ग्रामस्थ थकले
संपूर्ण गाव रस्त्यावर उतरला होता. एमआयडीसीचे अधिकारी भराव करीत होते. महिला आपली जागा वाचविण्यासाठी जिवाचा आकांत करीत होत्या. जेसीबी अडविण्याचा प्रयत्न करीत होत्या. परिस्थिती चिघळली होती. वातावरण तापले होते. अशातच पोलिसांनी महिलांसह गावातील नागरिकांना पोलीस ठाण्यात नेले. त्यावेळी शेतकरी जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच प्रांत अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, अधिकारी फोन बंद ठेवून निश्चिंत होते. त्यामुळे संतप्त जमावाने जिल्हाधिकारी झोपले असल्याची टीका करीत अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
धेरंड, शहापूर भूसंपादन प्रकिया अपूर्ण अवस्थेत आहे. तरीदेखील बळजबरीने पोलिसांचा धाक दाखवून पोहोच रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. प्रकल्पासह विकासाला विरोध नाही. परंतु, पुनर्वसनाबाबत बोलण्यास अधिकारी तयार नाही. भरपाईची वाच्यता होत नाही. संपादनाचा रुपयादेखील शेतकऱ्यांना मिळाला नसताना, त्यांची मुस्कटदाबी करीत भराव करण्यात आला आहे. बेकायदेशीर ताबा घेतला जात आहे. बाधित घरे, गोठे आदींचा सकारात्मक विचार व्हावा. सकारात्मक चर्चा होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. समस्त ग्रामस्थ धाकटे शहापूर येथील स्मशानभूमीवर उपोषण करतील.
– ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख







