रस्ता नूतनीकरणाचे काम धीम्या गतीने

रविप्रभा मित्र संस्थेची तक्रार

| म्हसळा | वार्ताहर |

शहरातील एसटी स्थानक ते नवानगर येथील एक किमी अंतराच्या रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता हा शहर बाजारपेठेत येण्यासाठीचा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून मागील महिन्यापासून एसटी वाहतूक पूर्णतः बंद आहे.रस्ता नूतनीकरणाचे काम सुरू होऊन एक महिना संपला तरी अद्याप एक मार्गिका पूर्ण झालेली नाही. रस्त्याचे काम विकसकांमार्फत धीम्या गतीने सुरू असल्याची तक्रार रविप्रभा मित्र संस्थेकडून करण्यात आली आहे.

रस्त्याच्या दिरंगाईमुळे शहरातील नागरिकांसह तालुका शहरात येणार्‍या-जाणार्‍यांची फारच हेळसांड होत आहे. अशातच एसटी स्थानक हे शहर सोडून खारगाव खुर्द सकलप हद्दीत स्थलांतर केले असल्याने एसटी प्रवासीवर्गाची गैरसोय होत आहे. बाजारातून एसटी स्थानकावर जाण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नसल्याने रिक्षाने प्रवास केल्यास 50 रुपये भाडे मोजावे लागते. रस्त्याचे बांधकाम गतीने झाल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टळेल याच मागणीसाठी सामाजिक सेवा आणि अन्यायाला वाचा फोडणारी रविप्रभा मित्र संस्था पुढे आली आहे. संस्था अध्यक्ष रवींद्र लाड यांनी म्हसळा तालुका तहसीलदार, बांधकाम विभाग अभियंता आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन रस्ता बांधकामाचे संथ गतीने होत असलेले काम गतीने करावे, अशी मागणी केली आहे. रस्ता बांधकामाबाबत यापुढे अशीच दिरंगाई होत असेल तर रविप्रभा मित्र संस्था जनतेसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना अध्यक्ष रवींद्र लाड यांच्यासमवेत संचालक मंडळाचे सचिव संतोष उद्दरकर, संचालक नरेश विचारे, सुजित काते, सुशांत लाड, समीर लांजेकर उपस्थित होते.

Exit mobile version