माणगाव येथे रस्ता सुरक्षा अभियान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| माणगाव | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे वाहनचालक मालकांना मोलाचे मार्गदर्शनासाठी शिबीर घेण्यात आली आहेत. असेच एक शिबीर माणगाव शहरात गुरुवारी (दि.29) घेण्यात आले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार – वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांनी वाहन चालक-मालक यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा अभियान म्हणजे समाजाच्या सुरक्षेचे अभियान असून वाहन चालविताना प्रत्येक वाहन चालकांनी चालकाने स्वतःची तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने वाहनांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघातास आळा बसू शकतो.

तसेच, प्रत्येक वाहन चालकाने आपल्या वाहनांची कागदपत्रे तसेच आपले वाहन सुस्थितीत आहे की नाही, याची खात्री करूनच वाहन चालविले पाहिजे. मोटारसायकलस्वारांनी डोक्यात हेल्मेट घालूनच वाहन चालविले पाहिजे. चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट लावूनच वाहन चालविणे. प्रत्येक वाहन चालकांनी वाहन चालविण्याचा परवाना काढला पाहिजे. तसेच वेगावर नियंत्रण ठेऊन जादा भार टाळले पाहिजे. वाहन चालविताना प्रत्येकाने योग्य काळजी घेतली तर अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेकांचे जीव वाचतील, असे सूर्यकांत गंभीर यांनी सांगितले.

माणगावमध्ये झालेल्या रस्ता सुरक्षा अभियान शिबिरात माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. श्रेयश कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी 96 वाहन चालकांची नेत्र तपासणी तसेच 96 वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात उपप्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गुलाब सोळंकी, अक्षय तुपसमुद्रे, विशाल जाधव यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला मोटार प्रशिक्षण स्कुलचे अभिजित पत्की, सुभाष कदम, विनय होमकर, हेमंत जोशी, बंधू भोनकर, मनोज गांधी, येलवे, गजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version