| खालापूर | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील वावोशी गारमाळ येथील नागरिक रस्त्याच्या आजही प्रतीक्षेत असून, या रस्त्याला अजूनही निधी मिळाला नाही. नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीत हे गाव असून, सुमारे अडीच कि.मी.चा हा रस्ता आहे. या रस्त्याविषयी खालापूर तहसील आणि वनविभाग, प्रकल्प अधिकारी यांची सोमवारी ग्रामस्थांसोबत बैठक झाली. बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली, मात्र या रस्त्याला निधीची प्रतीक्षा आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरीही गारमाळ धनगरवाडा आणि आदिवासी बांधव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे येथील ग्रामस्थ, शाळेतील मुलांना दररोज अडीच कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. तर, पावसाळ्यात या ठिकाणी दुचाकीही जात नसल्याने येथे कोणी आजारी पडल्यास झोळी करून आणावे लागत आहेत. सरकार एकीकडे मोठमोठ्या घोषणा करीत आहे, मात्र खालापुरातील ही गावे विकासापासून दूर आहेत. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, आता फक्त निधीची आवश्यकता असल्याची माहिती ग्रामस्थ अनंता हिरवे यांनी दिली आहे.
या बैठकीला नायब तहसीलदार राठोड, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, वनविभाग अधिकारी राजेंद्र पवार, आदिवासी प्रकल्प अधिकारी जगदीश भानुशाली, नियोजन अनंतकुमार हेमाडे, वनपाल पाटील, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील, अभिजित पाटील, ग्रामस्थ अनंता हिरवे, नागेश हिरवे, किरण हिरवे, राम वाघमारे, चंद्रकांत आखाडे, बाबू हिरवे, विलास गोरे, दिनेश गोरे, नरेश हिरवे, बबन हिरवे, दिलीप डाके, दीपक मोरे, सुभाष मोरे, संदीप हिरवे आदी उपस्थित होते.