करंजाडेवासीयांचा रास्ता रोको आंदोलन

| नवीन पनवेल | वार्ताहर |

करंजाडे वसाहतीला गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईचे ग्रहण लागलेले आहे. पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दि.10 जूनपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा करंजाडे वासीयांनी दिला होता. दि.10 जूनपर्यंत सिडकोने पाण्याबाबत काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे दि.18 जून रोजी करंजाडे वसाहतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जेएनपीटी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी दिली.

करंजाडे वसाहत सिडकोने वसवली आहे. मात्र मूलभूत सुविधा पुरवण्यात सिडको अपयशी ठरल्याचे दिसून येते. पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवाशी हैराण झाले आहेत. पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी विनोद साबळे यांच्या अध्यक्षतेखाली करंजडेवासी यांनी सभा आयोजित केली होती. यावेळी दि.10 जूनपर्यंत सिडकोला पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अल्टिमेटम देण्यात आला. मात्र दहा तारीख उजाडुन गेली तरीदेखील सिडकोने येथील पाणीपुरवठा सुरळीत केलेला नाही. पाणी नसल्याने कामे उरकायची कशी असा सवाल महिलांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. रविवारी (दि.9) करंजाडे वसाहतीतील नागरिकांची बैठक पार पडली. यावेळी दि.18 जून रोजी जेएनपीटी रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. जोपर्यंत पाणी प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे विनोद साबळे यांनी सांगितले. करंजाडे वसाहतीतील नागरिकांनी सिडकोला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा तारखेपर्यंत वेळ दिली होती. मात्र पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने रास्ता रोको आंदोलन दि.18 जूनला करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सर्व करंजाडे एकत्रित येण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहेत.

रोजच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यामुळे करता येत नाहीत त्यामुळे आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत. जास्त ताकदीने महिला या मोर्चात सहभागी होणार आहेत. आम्हाला पाणी विकत आणावे लागत आहे. रस्त्यावर उतरून रास्ता रोको करून सिडकोला जाब विचारणार असल्याचा इशारा महिलांनी दिला. पाणीटंचाईमुळे करंजाडेकर त्रस्त झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही असा निर्धार केला असल्याचे रामेश्‍वर आंग्रे यांनी सांगितले.

Exit mobile version