संथगतीचे काम अपघाताला निमंत्रण; गावांवर पाणी टंचाईचे संकट
| रायगड | प्रतिनिधी |
पर्यटनाचा जिल्हा म्हणून नावारूपाला येणाऱ्या रायगड जिल्ह्यात रस्ता रुंदीकरण, डागडुजी आणि डांबरीकरण करण्याकडे शासनाने भर दिल्याचे चित्र आहे. रस्ता कसा रखडला जातो याचे जिवंत उदाहरण रायगड जिल्ह्यातील मुंबई- गोवा महामार्ग ठरल्याचे सर्वश्रुत आहे. आता जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबागला जोडणाऱ्या रोहा आणि मुरुड तालुक्यातुन जाणाऱ्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. रस्ता रुंदीकरण हि काळाची गरज असलीतरी स्थानिकांसह प्रवाशांचे आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे. अलिबागकडून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम एमएसआयडीसी या शासनाच्या विभागाने सुरु करून सुखाचा दिलासा दिला असलातरी कामाचा वेग आणि पद्धत पाहता रुंदीकरण लांबल्याने आता खोदाई केलेल्या ठिकाणी अपघात होण्यास सुरुवात झाली आहे.

अलिबाग शहराबाहेर पडल्यानंतर आरसीएफ कॉलनीच्या कुरूळ गेटपासून बेलकडे फाट्यापर्यंत रस्ता खड्ड्यांचा असल्याचे वाहनचालक अनुभवत आहेत.कुरूळपासून अलिबागच्या दिशेने असणाऱ्या रस्त्यावर रुंदीकरणाचे काम सुरु आहे. काही दिवसांपासून हा रस्ता रुंदीकरण करण्याची पावले उचलण्यात आली होती. पण हे काम निधी असतानादेखील संथ गतीने सुरु आहे. बेलकडेफाटा ते आरसीएफ कॉलनी गेट कुरूळ या दरम्यान काम करणाऱ्या कंपनीने चार ठिकाणी रस्ता खोदाई करून ठेवला आहे.
एमएसआयडीसीने रस्ता रुंदीकरण करताना कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. अलिबाग ते बेलकडे या मधल्या पट्ट्यात एमएसआयडीसीने चार ठिकाणी खोदाई केली आहे. या चार ठिकाणी छोट्या मोऱ्या आहेत. या मोऱ्यांचे काम युद्धपातळीवर करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. रस्त्याचा भाग खाडीलगत असल्याने खोदाई केलेल्या ठिकाणी पाणी साठत आहे. वाहनचालकांच्या दृष्टीस पडून त्यांनी सावधगिरी बाळगावी अशी चिन्हे लावण्यात आलेली नाहीत. हा रस्ता खोदताना पोकलेन वापरण्यात येत असल्याने या रस्त्याच्या खालून जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईन तुटल्याने आजूबाजूच्या परिसरातील जनतेला पाणीसंकटाला सामोरे जावे लागत आहे.
अलिबाग कडून बेलकडेकडे जाणारा रस्ता आधीच अरुंद त्यात आता एमएसआयडीसीने रुंदीकरणासाठी खोदला आहे. रस्त्यात पडलेले खड्डे आणि ते बुजवण्यासाठी टाकलेली माती यामुळे या रस्त्यावर दैनंदिन अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातांमध्ये दुचाकी वाहनचालकांची संख्या अधिक आहे. एमएसआयडीसीने याच रस्त्यावर बेलकडे थांब्याच्या पुढे रस्त्यात असणाऱ्या छोट्या मोरीचे काँक्रिटीकरण करून पाईप टाकण्यासाठी खोदाई केली आहे. हि खोदाई रस्त्याच्या वळणावर असल्याने याठिकाणी अपघात घडत आहेत. एमएसआयडीसीने तातडीने लांबणीवर गेलेले रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लावावे अशी मागणी होत आहे.
संथगतीचा फटका गेलच्या प्रकल्पाला
अलिबाग रोहा रस्त्यावरील वाढावं आणि वेळावेळी दरम्यानचा पूल कोसळला आणि गेलच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम रखडले आहे. जोपर्यंतरस्त्यावर गुणवत्ता पूर्ण पुलाची उभारणी केली जात नाही तोपर्यंत प्रकल्प उभारण्यासाठी आणण्यात आलेली यंत्रणा गेलं कंपनीपर्यंत पोहचू शकणार नाही. यामुळे पुलाचे काम तातडीने होण्याच्या दृष्टीने गेलं व्यवस्थापन देखील शासन दरबारी हेलपाटे मारताना दिसत आहे. पूल उभारणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने शासनाला पाठवला आहे. अद्याप पूल उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नसल्याने हा पूल उभारणीचे कामदेखील लांबणीवर गेले आहे. एकूणच राज्य शासनाच्या दिरंगाईचा फटका केंद्र शासनाच्या प्रकल्पाला बसला आहे अशी चर्चा तालुक्यात आहे.







