। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. तक्रार करून पण अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते. अखेर नागरिकांनी सोशल मिडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला. यावर अधिकारी वर्गाने तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
माथेरान शहरतील वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटर रेल्वे स्टेशनजवळ असल्याने व नामांकित हॉटेलकडे जाणार्या रस्त्यावर असल्यामुळे येथील परिसरात पर्यटकांची व नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. तसेच येथील रस्ता हा उताराचा असून पावसाच्या पाण्यामुळे येथील रस्त्याचे क्ले-पेव्हर ब्लॉक निखळून गेल्याने या रस्त्याला जागोजागी खड्डे पडून रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली होती. रस्त्यावरून चालताना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. याबाबत पालिकेला निवेदन देऊनदेखील रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर नागरीकांचा संताप अनावर होऊन त्यांनी सोशल मिडियाद्वारे अधिकार्यांवर टीका करीत आपला रोष व्यक्त केला. हुतात्म्यांचे नाव दिलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे व रस्त्याची सुधारणा करून रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी केली. यावर अधिकारी वर्गाने याची दखल घेत तात्काळ काम सुरू केले आहे. निखळलेले ब्लॉक लावण्याचे काम सुरू झाल्याने येथील दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.