माथेरानमधील रस्त्यांची कामे निकृष्ट

पेव्हर ब्लॉकच्या दर्जाबाबत सर्वांचेच मौन

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील रस्त्यांच्या कामांचा दर्जा अतिशय खराब असून जुन्या कामांची डागडुजीही नीट झालेली नाही. या कामांच्या ठेकेदारांनी नेमके केले तरी काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

शहरामध्ये एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून जवळपास शंभर कोटी रुपयांची कामे सुरू होती. त्यातील दस्तुरी नाक्यापासून ते पांडे रोड ह्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याच्या कामाला जवळजवळ 47 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सदर रस्ता वाचनालयापर्यंत पूर्ण झालेला आहे. पुढील रस्त्याच्या कामातील क्ले पेव्हर ब्लॉकच्या उपयोगाबाबत सनियंत्रण समितीला अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले होते. त्यांनी अहवाल सादर करण्यात चालढकल केल्यामुळे सध्यातरी हे काम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. रस्त्याच्या नवीन कामास स्थगिती असली तरीसुद्धा जे काम केले आहे ते मातीचे पेव्हर ब्लॉक अत्यंत निकृष्ठ असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले असून मुख्य रस्त्यावर चिखल झाला आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यावरून प्रवास करताना पर्यटकांना त्याचप्रमाणे नेहमीच्या वाहतुकीच्या साधनांना जिकिरीचे बनले आहे.

या जुन्या कामांची डागडुजी अद्यापही संबंधित ठेकेदाराने केलेली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते काही ठिकाणी लावण्यात आले होते ते आजपर्यंत सुस्थितीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड त्याचप्रमाणे कस्तुरबा रोड वरील काही ठिकाणी केलेले रस्ते आजही मजबूत असून तग धरून आहेत. पाच ते सहा वर्षांपूर्वी त्या रस्त्याचे काम सुरू असताना कामे बरोबर नाहीत म्हणून अनेकांनी आकांडतांडव केले होते. तीच मंडळी सद्यस्थितीत मुख्य रस्त्यावर एम.एम.आर.डी.ए.ने निकृष्ठ दर्जाचे आणि कच्च्या स्वरूपाचे ब्लॉक लावलेले असताना मूग गिळून गप्प बसले आहेत. याबाबत गावात तर्कवितर्क लढविले जात आहेत. कदाचित एमएमआरडीए च्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराने विरोधात जाणाऱ्या मंडळींना अगोदरच काहीतरी आमिष देऊन आपली कामे पूर्ण करण्यासाठी सपाटा लावला होता, असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.

Exit mobile version