अलिबाग – रोहा आणि अलिबाग – रेवदंडा मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहे. भरधाव वेगात चालिवणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतूक आहे. परंतु बसविण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत. काही ठिकाणी गतिरोधक असल्याचे सूचना फलकदेखील उपलब्ध नाही. त्याचा फटका वाहन चालकांना कायमच बसत आला आहे. गतिरोधक जवळ आल्यावर अचानक वाहनाचा ब्रेक दाबल्यामुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याचा धोका वाढला आहे.
गतिरोधकांच्या पांढऱ्या पट्ट्यांअभावी अनेकवेळा दुचाकी व अन्य वाहनांना त्याचा फटका बसत आहे. कंबर दुखीबरोबर वाहन बिघाडाचा धोका वाढला आहे. वाहन चालकांसह प्रवाशांच्या मणक्यामध्ये, मानेमध्ये गॅप पडणे या सारखी दुखणी कायम स्वरूपी मागे लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे लावण्याबरोबरच सूचना फलकदेखील बसविण्यात यावे अशी मागणी प्रवासी, व चालक वर्गाकडून होत आहे.
– योगिता वडके