आदिवासींचे रास्ता रोको स्थगित

रस्ता वाहून गेल्याने आंदोलन
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केलेला रस्ता जुलै महिन्यातील अतिवृष्टीत वाहून गेला आहे. या रस्त्यासाठी निधी आणि वनजमिनीतून रस्ता करण्याच्या मागणीसाठी माथेरानच्या डोंगरात वस्ती करून राहणारे आदिवासी लोक 15 ऑगस्ट रोजी नेरळ-माथेरान घाटरस्त्यात रस्ता रोको आंदोलन करणार होते. दरम्यान, पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता बनविला जाईल, असे आश्‍वासन दिले आहे, त्यामुळे आदिवासी समाजाने रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे.
22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जुम्मापट्टी येथून माथेरानच्या डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता वाहून गेला आहे. त्याचवेळी श्रमदान करून तयार केलेला रस्ता वाहून जातानाच त्या रस्त्यात असलेले साकवदेखील नादुरुस्त झाले आहेत. आपल्या रस्त्याबाबत आदिवासी कार्यकर्ते जैतु पारधी, गणेश पारधी यांच्यासह आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची कर्जत येथे आल्यानंतर भेट घेतली. पालकमंत्री तटकरे यांनी आदिवासी लोकांना रस्त्यावाचून वंचित ठेवले जाणार नाही, असा शब्द देतानाच त्या वाड्यांकडे जाणारा रस्त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन आदिवासी लोकांना दिले. मात्र, एक महिन्यात बांधकाम विभागाने आणि प्रशासनाने कोणतीही पूर्तता केली नाही, तर मात्र 3 ऑक्टोबर रोजी आदिवासी संघटना उपोषण करील, असे जैतु पारधी यांनी जाहीर केले.

Exit mobile version