रस्ता गेला खड्ड्यात; निर्लज्ज प्रशासन, लोकप्रतिनिधींना नागरिकांचा सवाल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग – रोहा, अलिबाग- पेण, अलिबाग- मुरूड, अलिबाग – तळेखार, अलिबाग – रेवस मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नवरात्रौत्सवानंतर गुरुवारी अनेक मुर्तींसह घटांचे विसर्जन केले जाणार आहे. या खड्ड्यातूनच मिरवणुका काढण्याची वेळ भक्तांवर येणार आहे. रस्ता गेला कुठे असा सवाल निर्लज प्रशासनासह लोकप्रतिनिधींना नागरिकांकडून केला जात आहे.
रस्त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला, असल्याचा दिखावा आमदार दळवी यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांसह फलकांद्वारे जाहीरातीमार्फत केला आहे. मात्र, आलेला निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अलिबाग- रोहा मार्गावर, अलिबाग- रेवदंडा, अलिबाग- मुरूड साळाव ते तळेखार, अलिबाग- पेण मार्गावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डे चुकविताना अनेकवेळा अपघात झाले आहेत. दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. पर्यटकदेखील या रस्त्यावरून प्रवास करण्यास टाळत आहेत. त्याचा परिणाम अलिबाग मुरूडमधील पर्यटनावर होत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटकांचादेखील ओघ कमी झाला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगावर परिणाम होत आहे.
अलिबाग- पेण मार्गावरील खंडाळे, तिनविरा, धरमतर पुल ते शहाबाज येथे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असतानादेखील या रस्त्यावरून निश्चित स्थळी पोहण्यास तासनतास विलंब होत आहे. या रस्त्यावरून प्रवास नको रे बाबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विकासाच्या नावाखाली अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये साळाव ते तळेखार रस्त्याची अवस्था बिकट आहे. या मार्गावरील रस्ताच गायब झाला आहे.
अलिबाग – रेवदंडा, अलिबाग- मुरूड हे ठिकाण पर्यटनासाठी महत्वाचे ठरले आहेत. परंतु, येथील खड्डेमय रस्त्यामुळे प्रचंड त्रास चालकांसह पर्यटकांना होत आहे. अनेक वेळा चालकांना अपघाताला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सापुर्वी खड्डे मुक्त रस्ते करा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला देखील बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली आहे. खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास संबंधित विभागाकडेे निधीच उपलब्ध नसल्याने खड्डे बुजविण्याचे काम रखडले. काही विभागाकडे निधी असताना त्यांनी कामाचा दिखावा करीत मातीचा मुलामा डांबरी रस्त्यावर दिला. परंतु, पावसात माती पुर्णतः वाहून गेली. त्यामुळे रस्त्याची अवस्ता जैसे थे अशीच राहिली. रस्ता गेला कुठे असा सवाल निर्लज प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे.
पावसाळ्यातील रस्त्यांना खड्ड्यांचा साज,
डांबर उडून गेलं, साहेबांनाही नाही लाज…
खड्ड्यांच्या या गावात, वेगाला नाही वाव,
थांबत-धडपत चालणं, प्रवाशांवरच आले नाव…
ठेकेदाराला सलाम, असं केलं त्यानं काम,
बिनखडीच्या रस्त्यांनी प्रवाशांना फोडला घाम…
अधिकाऱ्यांना दुर्लक्ष भोवण्याची चिन्हे
आमदारांच्या ठेकेदारांची मोठी लॉबी असून त्यांचा अधिकाऱ्यांवर मोठा दबाव असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यातील अनेक कामे संशयास्पद असल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. या खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करताना अनेक अपघात झाले. मात्र, अद्यापही एकाही ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले गेले नाही. यामागे कुणाचा वरदहस्त आहे, यावरही नाक्यानाक्यावर चर्चा सुरु आहे. मात्र, आता लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास हजारो नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास अधिकाऱ्यांना हे चांगलेच महागात पडणार आहे.