माथेरानमधून क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते होणार हद्दपार

माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये पावसाळ्यात मोठया प्रमाणावर होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे होणारी मातीची धूप थांबविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून सर्वत्रच क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात येत आहेत. परंतु ह्या रस्त्यावरून घोडे घसरून पडतात यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी तक्रार येथील मूळवासीय अश्‍वपाल यांनी एमएमआरडीए कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार ही बाब लक्षात घेऊन अमन लॉज रेल्वे स्टेशन जवळील काळोखीचा भाग समजल्या जाणार्‍या अति चढावाच्या भागातील पूर्ण केलेल्या रस्त्याचे ब्लॉक काढण्यास सुरुवात झाली आहे. गावातील बहुतांश पॉईंट भागात सुध्दा आगामी काळात अशाप्रकारे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यासाठी नगरपरिषद एमएमआरडीएच्या माध्यमातून तत्पर आहे.परंतु माथेरानची शान समजले जाणारे घोडे हे त्या रस्त्यावरून घसरून पडतात अशी या अश्‍वपालकांची तक्रार आहे.
माथेरानमध्ये आजपर्यंत झालेल्या पर्जन्यवृष्टी मुळे जवळपास मातीच शिल्लक राहिलेली नाही. माथेरानची ही तांबडया मातीची ओळख जवळजवळ संपुष्टात येत चालली आहे. ह्या मातीची धूप थांबविण्यासाठी आणि इथला एकंदरीत परिसर अबाधित ठेवण्यासाठी पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याला सनियंत्रण समितीची सुध्दा हरकत नाही. मागील काळात 2007 मध्ये अशाचप्रकारे गावाच्या मुख्य रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत होते. त्यावेळी सुद्धा घोडे घसरून पडतील असे घाणेरडे राजकारण खेळले गेले आणि हा मुख्य महात्मा गांधी मार्ग अपूर्णावस्थेत राहिला त्यावेळेस नगरपरिषदेत कृती समितीची सत्ता अस्तित्वात होती. त्यामुळे त्यावेळी ज्याप्रमाणे अशा महत्त्वपूर्ण विकास कामांना खोडा घालण्यात आला त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा इथे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच राजकीय डावपेचांचा नाहक त्रास सर्वसामान्य लोकांना, व्यापारी वर्गाला आणि विशेष करून पर्यटकांना होत आहे. विकासात्मक कामासाठी वापरले जाणारे हे काहीअंशी का होईना ब्लॉकचे पर्यावरण पूरक रस्ते तग धरू शकतात. परंतु हे ब्लॉकचे रस्ते नक्कीच कालबाह्य होण्याची चिन्हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.

Exit mobile version