ई-रिक्षा चालकांची तारेवरची कसरत
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये येण्यासाठी नेरळमार्गे माथेरान या घटमार्गाशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. तसेच, मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरीपासून गावात चालत जावे लागते. पर्याय म्हणून हातरिक्षा किंवा घोड्याची रपेट करत जाता येते. तसेच, पर्यटन वाढीच्या दृष्टीने आणि आपत्कालासाठी अल्प प्रमाणात ई-रिक्षांची सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु, अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या ई-रिक्षांमुळे पर्यटकांसह स्थानिकांना तिची तासनतास वाट पाहण्याची नामुष्की ओढावत आहे. त्यातच येथील रस्त्यांच्या दयनिय अवस्थेमुळे ई-रिक्षा चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्याने माथेरानमधील निसर्ग फुलले असून पर्यटकांची नियमितपणे एकप्रकारची जत्रा भरलेली दिसते. वेळप्रसंगी राहायला खोल्या सुद्धा उपलब्ध होत नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक ई-रिक्षा सुरू झाल्यापासूनच गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे येथील सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, ई-रिक्षांची अपूरी पडणाऱ्या सेवेमुळे सर्वांचाचा हिरमोड होत आहे. माथेरानमध्ये सध्या वीस ई-रिक्षा कार्यरत आहेत. परंतु, त्यातील पंधरा ई-रिक्षा या येथील शालेय विद्यार्थ्यांना नियमीतपणे ने-आण करत असतात. त्यामुळे उर्वरित पाच रिक्षांवर पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या प्रवासाचा भार येतो. वेळावेळी अधीक ई-रिक्षांची मागणी करून देखील ई-रिक्षांच्या संख्येत वाढ करण्यात येत नाही. त्यातच येथील रस्त्यांची रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय बनलेली आहे. त्यामुळे ई-रिक्षा चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
याच नादुरूस्त रस्त्यावरून संबंधित अधिकारी रोज ये-जा करती असतात. परंतु, तरीदेखील ते पर्यटकांसह स्थानिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. अशीच परीस्थिती कायम राहिल्यास एखादा भीषण अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच, खराब रस्त्यांमुळे ई-रिक्षांना सतात दुरुस्तीसाठी नेरळ अथवा पनवेल याठिकाणी न्यावे लागत आहे. त्या ने-आण करण्यात आणि दुरूस्तीसाठी प्रचंड प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते.
दस्तुरी जवळील काळोखी या तीव्र चढावाच्या भागात रस्ता खूपच खडतर बनलेला असून अधिकारी वर्ग नियमित याच ई-रिक्षातून प्रवास करतात. त्यांनी प्रामुख्याने या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. रिक्षा, पर्यटक, घोडे आणि पादचाऱ्यांची याच अरुंद रस्त्यावरून सातत्याने रहदारी सुरू असते. लवकरच हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनविला नाही, तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संतोष लखन,
माजी नगरसेवक
देशातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. भले त्याठिकाणी मोटार गाड्या धावतात. त्या तुलनेत माथेरान हे एक अतिशय सुंदर ठिकाण असून प्रदूषण मुक्त स्थळ आहे. परंतु, येथील रस्त्यांची व्यवस्था उत्तम प्रकारे असणे आवश्यक आहे. ई-रिक्षातून येत असताना खूपच खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना त्रासदायक ठरत आहे.
सिद्धेश्वर पटनाईक,
पर्यटक, मुंबई







