माथेरानमधील रस्ते अंधारात; प्रमुख रस्त्यावर दिवे बंद अवस्थेत

प्रशासनाचा अंकुश नसल्याचे चित्र

| नेरळ | वार्ताहर |

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्याने धुक्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची माथेरानला पहिली पसंती मिळत आहे. दरम्यान, त्याच माथेरानमधील रस्त्यांवर विजेचे दिवे बंद असल्याने बहुसंख्य रस्त्यांवर अंधार दाटला आहे. तर प्रशासन सुस्त असल्याचे दिसत असून प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसल्याने रस्ते अंधारात हरवत आहेत. गर्द वनराई यामुळे येथील पाऊस देखील भरपूर असतो आणि त्यामुळे पावसाळ्यात धुक्याची दुलई आणि पावसाचे पाणी अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.पावसाळा हा इतर ठिकाण पेक्षा वेगळा असतो. एकदा पावसाचा जोर वाढला तर पाऊस काही दिवस सलग लागून राहिलेला अनुभव माथेरानकर घेत असतात. शनिवार आणि रविवारी खूप गर्दी असते. त्याच झाडांमुळे पावसाळ्यात अधिक काळोख आढळून येतो आणि त्यामुळे रस्त्याने ये जा करताना रस्त्यावरील पथदिवे महत्वाची भूमिका बजावत असतात. परंतु येथील रस्ते रात्रीच्या वेळी अंधारात हरवल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हॉटेल बाहेर पडणारे पर्यटक आणि रात्रीच्या दस्टुरी येथे आलेले पर्यटकांना शहरात येण्यासाठी असलेल्या महत्मा गांधी या प्रमुख रस्त्यावर इंदिरा नगर भागापर्यंत विजेचे दिवे बंद अवस्थेत आहेत. तर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर असलेले पथदिवे हे बंद अवस्थेत असून याकडे माथेरान गिरी स्थान नगरपरिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. माथेरान पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यावर आहे. मात्र शहरातील पायाभूत सुविधा आणि पर्यटकांना प्राथमिक सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Exit mobile version