पालीत पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, नगरपंचायत प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना उपचारापेक्षा उपाय भयंकर अशी ठरत आहे. रस्त्यांवरील मोठमोठाले खड्डे डांबरीकरण करून भरण्याऐवजी निव्वळ सिमेंट, ग्रीट आणि खडी वापरून बुजवण्यात आले होते. मात्र, पहिल्याच काही पावसांत हे मटेरियल बाहेर निघाल्याने व वाहून गेल्याने खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. शिवाय अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

पाली शहरातील जुने बस स्टँड, हटाळेश्वर चौक, मिनीडोअर स्टॅन्ड आणि गांधी चौक अशा मुख्य व गजबजलेल्या ठिकाणी तसेच इतरही ठिकाणी सध्या मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या मुख्य चौकांतून दिवसभर भाविकांसह शेकडो वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे वाहन चालवताना चालकांची मोठी तारांबळ उडत आहे. वाहने रस्त्यातील खड्ड्यात आपटत आहेत. वाहतूक कोंडीत भर पडण्यासोबतच दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

येथील सरकारी रुग्णालय आणि श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य तिठ्यावर (नाक्यावर) एक प्रचंड मोठा खड्डा पडला होता. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या खड्ड्यात सिमेंट आणि खाडी टाकून तो तात्पुरता बुजवला खरा; मात्र अवजड वाहनांची वर्दळ आणि पाऊस यामुळे हे मिश्रण उखडून रस्ता पूर्ववत झाला आहे. आता या ठिकाणी चक्क माती आणून टाकली आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. रुग्णवाहिका, आजारी रुग्ण आणि दर्शनासाठी येणारे भाविक यांना या चिखलातून व खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. येथे तातडीने पक्के डांबरीकरण करणे गरजेचे होते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.

प्रशासकीय अनास्थेवर संताप
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने पालीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी राज्यभरातून येत असतात. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या तात्पुरत्या आणि तकलादू मलमपट्टीपेक्षा कायमस्वरूपी डांबरीकरण करून रस्ते चकाचक करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नगरपंचायतने खड्डे बुजवण्यासाठी वापरलेली पद्धत अत्यंत चुकीची आहे. डांबरीकरण करून खड्डे भरायला हवे होते. आणि विशेष म्हणजे पाऊस इतका लांबल्याने हे सर्व करण्यास खूप वेळ होता. मात्र पावसामुळे आता ग्रीट आणि खडी हळूहळू रस्त्यावरून वेगळी होऊ लागली आहे, आता तर काही ठिकाणी चक्क माती टाकली आहे. ज्यामुळे दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली
Exit mobile version