पहिल्याच पावसात रस्ते गेले पाण्याखाली

। नेरळ । वार्ताहर ।

नेरळ आणि कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्या खाली गेले आहेत. पहिल्याच मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीत दोन घरांमध्ये, तर एका किराणा दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक नाले बंद केल्याने, तसेच मान्सून पूर्वी नाले सफाई केली नाही का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

राज्य हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस होणार असल्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार गुरुवार 21 जून रोजी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसून आला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत याच मुसळधार पावसाने अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने मान्सून पूर्वी नाले सफाई कुठे केली, म्हणून नागरिकांनी प्रश्‍न विचारत ग्रामपंचायतीचा कारभार उघड्यावर पाडला आहे. नेरळ परिसरातील गोरा कुंभार परिसरातील रस्त्यावर गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. परिसरात दुर्गंधी सुटली होती. मुख्य आणि जुन्या बाजारपेठेत देखील पाणी रस्त्यावर साचल्याचे चित्र पहावयास मिळत होते. नेरळ हेटकर आळी परिसरात क्षिरसागर यांच्या येथील रस्ता पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला होता. नेरळ कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टॉप परिसरात पाणी साचल्याने नागरिक पाण्यातून पायवाट काढत होते. कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीतील हजारे नगर परिसरात रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद केल्याचे दिसून येते. नागरिकांना त्रास झाला.

Exit mobile version