सायबर चोरटयांनी लुबाडले

| पनवेल | वार्ताहर |

पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने नवीन पनवेल भागात राहणार्‍या महिलेचे तब्बल 12 लाख 16 हजार 400 रुपये सायबरटोळीने लुटले आहेत. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. नवीन पनवेल भागात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेला एका सायबरटोळीने व्हॉट्सअ‍ॅपवर पार्टटाइम जॉबबाबत मेसेज पाठवला. या महिलेने काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितल्यावर दोन लिंक पाठवून देत दोन रेस्टॉरंटला रेटिंग देण्यास सांगितले.

त्यानुसार रेटिंग देत स्क्रिनशॉट्स पाठवले. त्यानंतर पुढील टास्कसाठी टेलिग्रॅम अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर सायबरचोरांनी तिच्याकडून वैयक्तिक माहिती व बँक खात्याची माहिती मागून घेतली. एका लिंकद्वारे टेलिग्राम ग्रुपवर घेण्यात आले. या महिलेने पहिला टास्क पूर्ण करताच तिच्या बँक खात्यावर 150 रुपये पाठवून देण्यात आले. या महिलेला एकूण 22 टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी 7 टास्कनंतर पुढील टास्कसाठी एक हजार रुपये पाठवण्यास सांगण्यात आले. ही रक्कम पाठवताच तिच्या खात्यावर 1300 रुपये पाठवून तिला पैसे मिळतील, याची खात्री करून देण्यात आली. त्यापुढील टास्कसाठी तिला आणखी 3 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. ती रक्कम या महिलेने पाठवून दिली. अशा पद्धतीने पुढील टास्कसाठी जवळपास 12 लाख 16 हजार 400 रुपये पाठवले. त्यावेळी नफा म्हणून 29 लाख रुपये मिळणार, असे सांगण्यात आले. मात्र ती रक्कम काही मिळाली नाही.

Exit mobile version