उरणमध्ये प्रवासी वाहनचालकांची लूट

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील प्रवासी जनतेसाठी सुरू करण्यात आलेला उरण ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास सुरू झाल्याने उरणकर प्रवासी सुखावले आहेत. दरम्यान, प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्याचा खर्च जरी स्वस्त असला, तरी येथील पार्किंग व्यवस्थेने प्रवाशांची लूट चालविली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पार्किंगच्या लूटमारीकडे प्रत्यक्षात लक्ष घालून होणारी लूटमार थांबवावी, अशी मागणी प्रवासी जनतेकडून होत आहे.

तालुक्यातील बोकडवीरा, रांजणपाडा येथील रेल्वे स्थानकांवर पार्किंग व्यवस्था करणार्‍या ठेकेदारांकडून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी या वाहनांसाठी 20 रुपये, 40 रुपये व 60 रुपये असे दर आकारल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पार्किंगच्या नावाखाली स्थानिक वाहनचालकांची लूट चालवली आहे. यामुळे दररोज ठेकेदार व वाहनचालकांच्यात शाब्दिक बाचा-बाची होत असतात. मुंबई ते उरण परतीचे रेल्व तिकिट 40 रुपये आहे. मात्र, पार्किंगचे अतिरिक्त 60 रुपये भरावे लागत आहेत. म्हणजे रेल्वेच्या प्रवासापेक्षा अधिक पैसे पार्किंगसाठी मोजावे लागत आहेत. जर, रेल्वेच्या प्रवास भाड्यापेक्षा जर पार्किंगचा खर्च जास्त येत असेल तर रेल्वे प्रवासी रेल्वे प्रवासापासून दुरावतील. ही रेल्वे प्रवाशांची कुचुंबनाच होत आहे, अशी चर्चा रेल्वे प्रवाशांमध्ये सुरू आहे. तरी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीरबाबीकडे लक्ष घालून प्रवासी वाहनचालकांची पार्किंगसाठी होणारी लुटमार थांबवावी, असे आवाहन स्थानिक प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version