ऑलिम्पिकमधून रॉजरची माघार

गुडघेदुखीमुळे घेतला निर्णय
| टोकियो | वृत्तसंस्था |
टेनिस स्टार रॉजर फेडररनं टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार नसल्याचं रॉजर फेडररनं जाहीर केलं आहे. 20 ग्रँड स्लॅम आपल्या नावे करणार्‍या फेडरर सध्या गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. त्यामुळेच रॉजर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही. रॉजर फेडररला यापूर्वीही गुडघ्याच्या दुखण्यामुळे 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आलं नव्हतं. तसेच सर्बियाचा जगातील नंबर वनचा टेनिसपटू नोवाक जोकोविचचंही ऑलिम्पिकमध्ये खेळणं निश्‍चित नाही.

विम्बल्डन स्पर्धेदरम्यान मला गुडघ्याचं दुखणं सुरु झालं आणि मी स्विकारलं की, मला टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली पाहिजे.
रॉजर फेडरर

फेडरर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नसल्यामुळं निराश आहे. याबाबत बोलताना रॉजर म्हणाला की, मी खरंच खूप निराश आहे. कारण जेव्हाही मी स्वित्झर्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे, हे माझ्या कारकिर्दीतील सन्मान आणि मुख्य आकर्षण राहिलं आहे. मी या उन्हाळ्याच्या शेवटी परतण्याच्या दृष्टीकोनातून आधीच क्वॉरंटाईन सुरु केलं आहे. मी संपूर्ण स्विस संघाला शुभेच्छा देतो.
रॉजल फेडररला रविवारी संपलेल्या विम्बल्डन 2021 च्या क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 39 वर्षाच्या रॉजर फेडररनं 2008च्या ऑलिम्पिकमध्ये डबल्स इव्हेंटमध्ये स्टेन वावरिकासोबत गोल्ड मेडल जिंकलं होतं. परंतु, सिंगल्समध्ये क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रॉजर फायनल्समध्ये ब्रिटनच्या एंडी मरेकडून पराभूत होत सिल्वर मेडलवर आपलं नाव कोरलं होतं.

Exit mobile version