पैसे गोळा करण्यासाठी पोलिसांची मदत; व्यापारी, नागरिकांमध्ये संताप
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडात झाला आहे. यामुळे रोह्याचे नवीन नगरपालिका मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पोलीस बंदोबस्तात थकीत वसुलीसाठी व्यापारी तसेच नागरिकांच्या दारात जाऊन वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस बंदोबस्तात रोहा पालिकेच्या होत असलेल्या वसुली मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे.
महाराष्ट्रात लागू झालेल्या टाळेबंदीचा ग्रामीण आणि शहरी भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे.रोह्यातील अनेकांच्या रोजगारावर त्यामुळे गदा आली आहे. ज्यांचे पोट हातावर आहे, अशा लोकांच्या हालअपेष्टांना तर पारावार उरलेला नाही. व्यापार्यांची अवस्था बिकट झाली आहे.
अनेकांनी आपले आधार गमावले आहेत. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. या संकाटाचा सामना रोहा अष्टमीकर सर्व वाद बाजूला ठेवून एकजुटीने करीत आहेत.पोलिस, नगरपालिका कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच कोरोना योध्दे रोहेकरांसाठी देवदूतच ठरले आहेत.
कोरोना महामारीचे संकट येण्यापूर्वी रोहे अष्टमी नगरपालिकेने शंभर टक्के कर वसुली करुन विक्रम केलेला आहे. नागरिकांनीही नगरपालिकेला नेहमी संपूर्ण सहकार्य केलेले आहे. गेले वर्षभर नगरपालिकेला पुर्ण वेळ मुख्याधिकारी नव्हते. त्यामुळे प्रशासनाला काम करताना मर्यादा येत होत्या. मात्र नव्यानेच रुजू झालेले रोहे अष्टमी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना नागरिकांच्या परिस्थितीची अजिबात पर्वा नाही आहे.
वास्तविक आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना त्यांनी धीर देणे गरजेचे होते. मात्र गरीब व्यापारी आणि नागरिकांना घरोघरी जाऊन धमकावत कर वसुली सुरू केली आहे. वसुलीसाठी घरी येणारे पोलिस पाहून नागरिक धास्तावले आहेत. पोलिसांचा फौजफाटा घेत मुख्याधिकारी पिडलेल्या व्यापार्यांचे गाळे बंद करत आहेत. पदाचा गैरवापर करून दहशत निर्माण करणे ही या शहराची संस्कृती नाही. रोहेकरांना फक्त जीव लावायचे ठाऊक आहे म्हणूनच अनेक अधिकारी आज रोह्यातच स्थायिक झालेले आहेत.जोर जबरदस्तीने होत असलेल्या वसुलीचा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष समीर शेडगे यांनी निषेध केला आहे.तर मूठभर ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप देखील काही नागरिकांनी केला आहे.