अडीच लाखांची गावठी दारू नष्ट
| रोहा | प्रतिनिधी |
रोह्यातील जंगल भागात गावठी दारू निर्मितीचे अड्डे सुरु असल्याची माहिती रोहा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने जंगल भागात 1 किलो मीटर अंतर पायपीट करत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी असलेली सुमारे अडीच लाख रुपये किंमतीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व अन्य साहित्य जाळून नष्ट केले. तसेच, चार गावठी दारू माफियांविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. रोहा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गावठी माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रोहा पोलीस ठाणे हद्दीतील करविणे जवळील टिटवी गावातील घनदाट जंगल भागात नदीच्या ओहळमध्ये गावठी दारू हातभट्टी सुरू होती. याठिकाणी दारू तयार करुन ती मुरूड परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती रोहा पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक नेमण्यात आले. त्यांनी शनिवारी (दि.13) दुपारच्या सुमारास टिटवी येथे धडक दिली. या गावापासून साधारण 1 किलो मीटर अंतरावर जंगल भागात पायी चालत जाऊन नदीच्या ओहळात तीन झोपड्या दिसल्या. या ठिकाणी गावठी दारू पाडण्यासाठी लागणारे रसायन, लाकडे, भांडी व प्लास्टिकचे 16 पिंप आढळले. त्यामध्ये सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किंमतीची 4 हजार लिटर गावठी दारू मिळून आली. त्यातील काही रसायन रासायनिक विश्लेषण करिता पोलिसांनी पंच समक्ष ई-साक्ष नुसार पंचनामा केला. या कारवाईच्या दरम्यान घटनास्थळी योगेश साहू झोरे (26) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही दारूभट्टी योगेश झारे याच्याह मिलिंद दामू झोरे, काशिनाथ बाबू ढेबे व बाळाराम कोंडू होगडे यांची असल्याचे समजले. यादरम्यान गावठी दारू माफियांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर हस्तगत केलेला दारू भट्टीचा माल दोन पंचा समक्ष तोडून फोडून नष्ट करण्यात आले.
