१५ लाखांचे नुकसान
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील दिंगबर नारायण चव्हाण यांची 4 सिलेंडरची यंत्रचलित दालंदी मासेमारी नौका रोहिदास बोटीला नांदवली दीपस्तंभ मणेरी खडकाजवळ खोल समुद्रात बुडाली. बोटीत असणारे सात जण सुखरूप आहेत. मात्र, यात 15 लाखांचे नुकसान झाले आहे.
मुरुड-राजपुरी बंदराजवळून दिंगबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची 4 सिलेंडरची यंत्रचलित दालंदी मासेमारी रोहिदास नौका क्रमांक आय.एन.डी. एम.एच.3 एम. एम. 561 नेहमीप्रमाणे मासेमारीकरिता सकाळी 6च्या सुमारास निघाली होती. यात (1 नाखवा व 6 खलाशी) दिगंबर नारायण चव्हाण, नारायण पद्मा चव्हाण, मयुरेश नारायण चव्हाण, लहु महादेव मालीम, सोमनाथ धनंजय चव्हाण, लहु पद्मा वासकर, प्रदिप परशुराम वासकर असे सात जण होते. नांदवली दीप स्तंभ मणेरी या खोल समुद्रात मासेमारी करित असताना बोटीच्या पंख्याच्यामध्ये खडक लागल्याने बोटीत पाणी शिरले. त्यामुळे बोटीचा ताबा सुटू लागला. नाखवा-दिगंबर चव्हाण यांनी त्वरित त्याच परिसरात मासेमारी करित असणारी गंगा सागर बोटीचे मालक राजपुरी येथील दिलीप नारायण आगरकर यांना कळविले. ताबडतोब दिलीप आगरकर यांनी आपली बोट त्या दिशेने वळवली.
परंतु, तोपर्यंत रोहिदास बोट बुडू लागल्याने बोटीवर असणारे नाखवासह 6 खलाशी यांनी समुद्रात उड्या मारल्या. नाखवा व खलाशांना वाचवण्यासाठी दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटीचा वेग वाढवून नाखवासह 6 खलाशांना वाचवले. परंतु लहु पद्मा वासकर यांच्या नाकात तोंडात पाणी शिरल्याने दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून त्यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ मुंबई अध्यक्ष तथा मुरुड राजपुरी श्री लक्ष्मी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन विजय गिदी व प्रसाद आंबटकर आणि प्रलय आंबटकर यांनी दिली.