रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार

। बारामती । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात मतदान होत असलेल्या बारामती मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार गट आणि अजित पवारांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बारामतीच्या सभेत रोहित पवार हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या भाषणाची ही क्लीप चांगलीच व्हायरल झाली होती. नेमक्या त्याचवेळेला अजित पवार हेदेखील बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अखेरची सभा घेत होते. तेव्हा अजितदादांनी रोहित पवार यांचा व्हिडिओ दाखवत त्यांची खिल्ली उडवली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की, शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या, असे अजित पवार यांनी म्हटले होते. अजितदादांच्या या कृतीला रोहित पवार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

अजितदादा तुम्ही माझी अ‍ॅक्टिंग केल्याचं समजलं, पण नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि त्यासाठी विचार, काळीज, जिवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा. आणि हो वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही, असा पलटवार रोहित पवारांनी केला आहे.

Exit mobile version