एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या समाप्तीनंतर, आयसीसीने त्यांचे रँकिंग जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावणारा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने रँकिंगमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे. त्याने इतर सर्व फलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे रोहित शर्मा क्रिकेट विश्वात ‘हिट’ ठरला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे टिकाकारांची बोलती बंद झाली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत महत्त्वपूर्ण बदल दिसून आले आहे. त्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने अव्वल स्थान मिळवले आहे. यावेळी, त्याने दोन स्थानांनी झेप घेतली असून त्याचे रेटिंग 781 पर्यंत वाढले आहे. तसेच, रोहित शर्माने 2027 च्या विश्वचषक स्पर्धेची तयारी किती जबरदस्त केली आहे, हे नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून दिसली. सात महिन्यानंतर भारतीय संघाच्या जर्सीत परतलेल्या रोहितने त्या मालिकेत सर्वाधिक 202 धावा करून मालिकावीर पुरस्कार जिंकला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या नाबाद 121 धावांनी भारताने मालिकेचा शेवट गोड केला. रोहित शर्माने प्रथमच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले असून कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर आणि फलंदाज म्हणून मैदानात परतताच त्याने अर्धशतक आणि नंतर शतक ठोकले. त्यामुळे रोहित शर्माला अव्वल स्थान मिळवले आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मानंतर अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. दरम्यान, शुबमन गिल आता दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलचे रेटिंग सध्या 745 आहे. पाकिस्तानचा बाबर आझम 739 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा डॅरेल मिचेलनेही एका स्थानाने झेप घेतली आहे, तो आता 734 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहली एका स्थानाने घसरून 725 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सर्वात वयस्क फलंदाजाचा विश्वविक्रम
रोहित शर्माने जगातील नंबर वन एकदिवसीय फलंदाज बनून विश्वविक्रम रचला आहे. तो नंबर वन स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. रोहितने 38 वर्षे आणि 182 दिवसांच्या वयात एकदिवसीय सामन्यांमध्ये नंबर 1 रँकिंग मिळवले आहे. रोहित शर्माच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिन तेंडुलकर 38 वर्षे आणि 82 दिवस वय असताना जगातील नंबर वन एकदिवसीय फलंदाज ठरला होता. रोहितने 18 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि आता तो पहिल्यांदाच नंबर वनवर पोहोचला आहे. रोहित हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर वन रँकिंग मिळवणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज आहे. रोहितची एकदिवसीय कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्याने आतापर्यंत 276 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11,370 धावा केल्या आहेत.
