। मुंबई । प्रतिनिधी ।
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. या कपिलच्या शोमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडू सहभागी झाले होते. शोमध्ये सहभागी झालेल्या रोहितने वर्ल्डकप दरम्यानच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवावर भाष्य केलं.
यावेळी रोहित शर्मा म्हणाला, ”वर्ल्डकप अंतिम सामन्याच्या बरोबर दोन दिवसआधी आम्ही अहमदाबादला गेलो. टीममधले वातावरण अतिशय सुंदर होेते. आम्ही अंतिम फेरीत सुद्धा चांगली सुरुवात केली होती. शुभमन आधी बाद झाला. परंतु, जेव्हा तुम्ही अंतिम सामना खेळत असता, तेव्हा मोठी धावसंख्या उभारावी लागते. जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण होईल. गिल बाद झाल्यावर मी आणि विराटने भागीदारी केली. पण, ऑस्ट्रेलिया या लढाईत आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे होती. त्यांनी उत्तम खेळ केला. त्यांच्या खेळाडूंनी उत्तम पार्टनरशीप देखील केली. मला वाटलं वर्ल्डकप भारतात होऊनही आपण हरलो त्यामुळे आज संपूर्ण देशातील चाहते आमच्यावर रागावले असतील. पण, लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलं. आमचं कौतुक केलं.” असं रोहितने सांगितलं.