बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली जवळपास वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धा खेळलेले नाही. मात्र, आता दोघांनीही टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे बीसीसीआयला कळविले आहे. त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकमध्ये रोहित आणि विराट खेळण्याची शक्यता वाढली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर भारताकडून टी-20 सामनना खेळलेले नाहीत. त्यांनी एकदिवसीय विश्वचषकाच्या 50 षटकांच्या सामन्यावर आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं होतं. आता त्यांनी टी-20 संघ निवडीसाठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे.
बीसीसीआय निवड समितीची शुक्रवारी बैठक होणार आहे. या बैठकीत 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी आणि 25 जानेवारीपासून इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बारतीय संघाची निवडीबाबत चर्चा होणार आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव हे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहेत, त्यामुळे निवड समिती नवीन कर्णधाराची घोषणा करू शकते. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांनाही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. हे दोघंही आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील सदस्य होते. हे दोन्ही प्रमुख गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त राहावे, अशी निवड समितीची इच्छा आहे. जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.







