। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय संघाचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा आणि रनमशिन विराट कोहली पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत. 30 नोव्हेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. रांचीच्या मैदानात या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी इतिहास रचेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत 391 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ही जोडी भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या जोडीचा विक्रम मोडीत काढतील. सचिन-द्रविड या जोडीनं आपल्या मोठ्या कारकिर्दीत 391 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळल्याचा रेकॉर्ड आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही टी-20 पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते फक्त आता वनडेतच सक्रीय आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात दोघांचा जलवा पाहायला मिळाला होता. आता रांचीच्या मैदानात एकत्र मैदानात उतरताच रोहित-विराट भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारी भारताची नंबर वन जोडी बनेल.
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या जोड्या
391 – रोहित-विराट – सचिन-द्रविड – द्रविड-गांगुली
367 – सचिन-कुंबळे
341 – सचिन-गांगुली
309 – कोहली-जडेजा
293 – सचिन-अझरुद्दीन
285 – कोहली-धोनी
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला रांचीच्या मैदानात खेळवण्यात येईल. त्यानं दोन्ही संघ 3 डिसेंबरला रायपूरच्या मैदानात दुसरा सामना खेळताना दिसली. 6 डिसेंबरला विशाखापट्टणमच्या मैदानातून या दोऱ्याची सांगता होणार आहे.







