माजी कर्णधाराकडून रोहितचे कौतुक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकेल असा सर्वांना विश्‍वास आहे. मागच्या वर्षी घरच्या मैदानावर झालेल्या एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाच्या अगदी नजीक पोहोचला होता. परंतु, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण झालेले पाहायला मिळाले होते. पण, अवघ्या 7 महिन्यांत भारतीय संघाने भरारी घेऊन आणखी एक विश्‍वचषकातील अंतिम फेरी गाठली आहे.

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय संघाच्या स्पर्धेतील वर्चस्वावर आनंद व्यक्त केला आणि यावेळी भारतीय संघ जेतेपद जिंकेल, असा विश्‍वास व्यक्त केला. मला वाटत नाही की तो सात महिन्यांत दोन विश्‍वचषकातील अंतिम सामने गमावेल. सात महिन्यांत त्याच्या नेतृत्वाखाली दोन अंतिम फेरी हरल्यास तो कदाचित बार्बाडोस महासागरात उडी घेईल, अशी गांगुलीने गंमत केली. सुपर-8 आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग सामने जिंकून आघाडीवर राहिल्याबद्दल गांगुलीने रोहितचे कौतुक केले. त्याने फ्रंटला राहून नेतृत्व केले आणि शानदार फलंदाजी केली. मला आशा आहे की ते अंतिम फेरीतही दमदार खेळी करतील. आशा आहे की भारताला अपेक्षित निकाल मिळेल आणि त्यांनी मनमोकळेपणाने खेळावे, असा सल्ला गांगुलीने दिले.

Exit mobile version