| खांब | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील सारस्वत समाज बांधवांचे स्नेहसंमेलन रविवारी (दि.12) रोह्यातील मातोश्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. सारस्वत हितवर्धक मंडळ, मुंबई आयोजित असलेले हे स्नेहसंमेलन, रायगड जिल्हा सारस्वत ब्राह्मण मंडळ, अलिबाग व रोहा सारस्वत परिवार यांच्या सहकार्याने घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सारस्वत हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सिनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी, निवेदक प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. सर्वप्रथम आलेल्या समाजबांधवांचे स्वागत नयन बागाव व ईशा तेंडुलकर यांनी त्यांच्या गीत गायनाने केले. त्यानंतर दीपक मुळ्ये यांनी स्नेहसंमेलनाचा हेतू विशद केला. नंतर मंडळाची आजवरची वाटचाल विनायक किनरे यांनी अत्यंत थोडक्यात सोप्या पद्धतीने मांडली. संपूर्ण राज्यात व काही प्रमाणात राज्या बाहेरही विविध सारस्वत संस्था कशाप्रकारे कार्य करत आहेत. याबाबीचा थोडक्यात परिचय प्रमोद तेंडुलकर यांनी उपस्थितांना करुन दिला. नंतर सारस्वत समाजातील स्थानिक कलाकार श्री. व सौ. कावतकर, सौ. बागाव, ईशा तेंडुलकर, स्वप्नेश किनरे, महेश कुवळेकर यांनी आपली गायन कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कावतकर व विनायक किनरे यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल रोहा सारस्वत परिवाराचे अध्यक्ष योगेश तेंडुलकर यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.