। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
खेळ कोणताही असला तरी पराभव हा कोणत्याही खेळाडूसाठी कठीणच असतो, त्यातही अंतिम सामन्यात झालेला पराभव अधिक बोचतो. असेच काहीसे दृश्य सौदीच्या किंग्स कप 2024 च्या अंतिम सामन्यानंतर दिसले. अंतिम सामन्यात अल हिलाल संघाविरुद्ध अखेरच्या क्षणी पत्करावा लागलेल्या पराभवानंतर अल-नासरचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रु अनावर झाले.
शुक्रवार (दि.31) मे जेद्दा येथे झालेल्या अंतिम सामन्यात अल हिलाल आणि अल नासर हे दोन संघ आमने-सामने होते. या सामन्याच्या निर्धारित वेळेनंतर 1-1 अशी गोल बरोबरी झाली होती. त्यामुळे पेनल्टी शुटआऊट झाले, ज्यात अल हिलालने 5-4 अशा फरकाने विजय मिळवला. त्यामुळे अल-नासरची विजेतेपद मिळवण्याची संधी हुकली. त्यामुळे या पराभवाने अत्यंत निराश झालेल्या रोनाल्डोला त्याचे अश्रु आवरता आले नाहीत. तो मैदानावरच निराश होऊन आडवा पडला. यावेळी त्याला त्याच्या संघातील सदस्यांनी सहानुभूती देत धीर दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रोनाल्डोसाठी यंदाचा हंगाम वैयक्तिकरित्या चांगला राहिला असला, तरी त्याला संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही, त्याचमुळे त्याची निराशा स्पष्ट दिसत होती. काही दिवसांपूर्वीच सौदी प्रो लीगमध्ये अल-नासरला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे, अल हिलालने पहिला क्रमांक पटकावला. तसेच, एशियन चॅम्पियन्स लगीमध्येही उपांत्यपूर्व फेरीत अल-नासरचा पराभव झाला होता.