तलाठी कार्यालयाचे पत्रे उडाले; दस्तावेज सुरक्षित

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तहसील कार्यालयाचे तलाठी सजा असलेले कोटिंबे येथील तलाठी कार्यालयाची सर्व पत्रे आलेल्या चक्री वादळाने उडून गेली आहेत. मात्र तेथील कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान दाखवल्याने महत्वाची कागदपत्रे सुरक्षित आहेत.

कशेळे मंडळ अधिकारी कार्यालयाशी संबंधित तलाठी सजा कोटिंबे गावात आहे. या गावाच्या बाहेर आंबिवली, धामणी रस्त्यावर तलाठी कार्यालयाची इमारत उभारली आहे. दोन खोल्यांच्या या इमारतीत कारकून कार्यालय आणि तलाठी यांची केबिन तसेच कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाटे अशी व्यवस्था आहे. कोटिंबे आंबिवली धामणी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या या तलाठी कार्यालयाला (दि.16) मे रोजी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले.त्या कार्यालयाच्या इमारतीची दोन्ही खोल्या आणि व्हरांडा यावरील बहुसंख्य पत्रे उडून रस्त्यावर जावून पडली. त्यावेळी कोणतेही वाहन तेथून जात नसल्याने मोठा अपघात झाला नाही. मात्र त्यावेळी तलाठी कार्यालयात असलेले महसूल कारकून सुनील गायकवाड यांनी तलाठी उमेशकुमार भेरे यांना दूरध्वनी वरून त्याबाबत माहिती दिली. नेरळ येथे अतिरिक्त पदभारचे ठिकाणी असलेले तलाठी भेरे हे तत्काळ कशेळेकडे रवाना झाले.

कार्यालयाचे झालेले मोठे नुकसान पाहता महसूल कारकून सुनील गायकवाड यांनी स्थानिक कोटिंबेवाडीमधील तरुणांना मदतीला घेतले. त्या इमारतीत पडलेली सिमेंट पत्रे बाहेर काढले आणि कार्यालयात साचलेले पाणी याकडे न पाहता कार्यालयात असलेली लोखंडी कपाटे हलवली. त्याचवेळी तलाठी यांच्या केबिनमध्ये असलेली सर्व कागदपत्रे हे सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम स्थानिकांनी केले. त्यावेळी पाऊस सुरूच होता आणि कर्मचार्‍यांनी पावसात भिजत सर्व कागदपत्र भिजू न देता तात्पुरता स्वरूपात सुरक्षित ठेवण्याचे काम केले.

Exit mobile version