| महाड | प्रतिनिधी |
शिवभक्तांसह आबालवृद्धांना अवघ्या चारच मिनिटांत घेऊन जाणार्या रायगड रोपवेची सेवा 5 ते 10 सप्टेंबरदरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडावर येणार्या शिवप्रेमी व पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड रोपवेचे व्यवस्थापक सतीश माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
किल्ले रायगडवर जाण्यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या कमजोर असणार्या व्यक्तींना गडावर जाणे-येणे शक्य झाले आहे. परंतु, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रोपवेची दर तीन-चार महिन्याने डागडुजी व दुरुस्ती करावी लागते. यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये रायगड रोपवेची सेवा देखभाल दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा देखभाल व दुरुस्तीसाठी 5 ते 10 सप्टेंबर या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शिवभक्तांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यादरम्यान पर्यटकांच्या होणार्या गैरसोयीबद्दल मिलेनियम प्रॉपर्टीज प्रा लि. कंपनीमार्फत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.






