कोकण पदवीधरांसाठी रस्सीखेच

| रायगड । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत होत, असतानाच आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना तिसर्‍यांदा संधी मिळेल, असे चित्र होते; पण आता मतदारसंघासाठी खलबते सुरू झाली आहेत. भाजपपाठोपाठ शिवसेना शिंदे गटही उमेदवारीसाठी आग्रह असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला उमेदवार जाहीर केल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीत एकत्र एका मंचावर दिसणारे पक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत परस्परांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होणार्‍या मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. 26 जूनला ही निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2018 मध्ये झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या निरंजन डावखरे दुसर्‍यांदा निवडून आले होते. त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेकडून माजी महापौर संजय मोरे यांना संधी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी सोडल्यामुळे निरंजन डावखरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नजीब मुल्लाही मैदानात उतरले होते. त्यावेळी निरंजन डावखरे यांना 32 हजार 831 मते मिळाली तर संजय मोरे यांना 24 हजार 704 मते मिळाली. अवघ्या पाच ते सहा हजार मतांच्या फरकाने निरंजन डावखरे दुसर्‍यांदा निवडून आले. त्यावेळी शिवसेना- भाजप युती होती. तरीही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देत निवडणूक लढवली होती. यावेळीही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. महायुतीतच कोकण पदवीधरच्या जागेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट व भाजपने एकत्रित ही निवडणूक लढवली तर यात भाजपच्या निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे शिवसेना शिंदे गट आपला हट्ट पूर्ण करणार की भाजप दावा सोडणार, याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेची पायरी तिसर्‍यांदा चढण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मतदारसंघ त्यांनी बांधला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्याची शक्यताही कमी असल्याचे म्हटले जात आहे; पण यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला बाहेरून पाठिंबा देणार्‍या मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होणार की डाव रंगणार हे लवकरच कळेल.

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपला महायुती म्हणून सहकार्य केले होते. भाजपकडे उमेदवार नसतानाही मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांना कमळच्या चिन्हांवर शिलेदार पाठवला. आता त्या मोबदल्यात कोकण पदवीधर मतदारसंघ घेण्याच्या तयारीत शिवसेना शिंदे गट असल्याचे समजते. दुसरीकडे महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा मनसेने दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीनेही बिनशर्त पाठिंबा मनसेच्या उमेदवाराला द्यावा, अशी अपेक्षा मनसेच्या गोटातून व्यक्त होत आहे. या सर्वांमध्ये खरी कसोटी ही भाजपची लागणार असल्याचे दिसते. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी एकसंघ होती. आता दोन्ही पक्षांचे दोन गट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाने अजून उमेदवारीसाठी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही; पण या बदलत्या समीकरणामुळे महायुतीच्या मतांमध्येही विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात जर महायुतीचे प्रमुख दोन पक्षच परस्पर विरोधात लढले तर ही निवडणूक आणखी चुरशीची होत आहे. उमेदवारांना विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे.

Exit mobile version