अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या हवामान विभागाने शनिवारी पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने सांगितलं की, पूर्व मध्य बंगालच्या खाडीत दाब वाढत असून ते चक्रीवादळात बदलू शकतं. गुलाब असं या चक्रीवादळाचं नाव असून दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशाच्या दिशेने जावू शकतं.
हवामान विभागाने म्हटलं की, कोलकाता, पूर्व मिदनापूर, उत्तर 24 परगना आणि दक्षिण 24 परगनासह पश्चिम बंगालच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या खाडीतून येणार्या या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागाला बसू शकतो. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी सांयकाळपर्यंत गुलाब चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवरून पुढे सरकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढच्या 6 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चक्रिवादळ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडीशा किनारपट्टी भागात रविवारी संध्याकाळपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यांत 26-28 मुसळधार पाउस काही ठिकाणी पडेल. हवामान विभागाने दिलेल्या आदेशानंतर कोलकाता पोलिसांनी कंट्रोल रुम सुरु केली आहे. सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोलकातासह पश्चिम बंगालच्या इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे ओढावणार्या आपत्तीचा सामना करण्यासाठी पोलिसांसह बचावपथके सज्ज आहेत.
आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्येही किनारपट्टी भागात त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. हवामान विभागाने म्हटलं की, शनिवारी ओडिशासह आंध्रप्रदेश किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडेल.