अलिबाग संघाचा सात गडी राखून पराभव
| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट क्लब कामोठे संघानी अंतिम विजय होण्याचा मान मिळवला आहे.
शनिवारी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात रोशन क्रिकेट क्लब संघानी जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघावर 7 गडी राखून विजय मिळवला आहे तर जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघ उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 32 अकॅडमी व क्लबच्या संघानी सहभाग घेतला होता. सदरची स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद फेरी नुसार खेळविण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत एकूण 55 एकदिवसीय सामने यशस्वीरित्या खेळले गेले. अंतिम सामन्यात जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाने प्रथम फलंदाजी करतांना 40 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 178 धावसंख्या उभारली. त्यामध्ये सलामीवीर फलंदाज अर्णव पाटील यांनी सर्वाधिक 65 स्वरूप कदम यांनी 34 धावांचे योगदान संघाला दिले, आरसीसी कामोठे संघाकडून आर्यमिक ढेंबरे यांनी 3 तर निखिल अहिरवाल यांनी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तर देताना आरसीसी कामोठे संघाने 32.5 षटकांत 179 धावांचे लक्ष पूर्ण करत सामन्यावर पकड घेतली. त्यामध्ये मीत पाटील यांनी 44 भव्यम झा यांनी 38 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग कडून कर्णधार ओम कवळे व राध्ये वालेकर यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. संपूर्ण स्पर्धेतील अंतिम विजयी संघ ठरला रोशन क्रिकेट क्लब कामोठे, उपविजयी संघ जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग.स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाचा खेळाडू अंश माळी,उत्कृष्ठ फलंदाज ओम कवळे जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग, उत्कृष्ट गोलंदाज वीर भोईर चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यजुर्व घरत प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यांना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव जयंत नाईक, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, शेखर भगत, अभिषेक खातू, रोशन अडे, जगदीश ढगे, पंच रमेश ढाकोळ, वरुण म्हात्रे, आदेश नाईक यांच्या हस्ते चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.






