गरजू मुलांना 20 सायकलींचे वाटप; शिक्षणासाठी कायमची पायपीट थांबली
| महाड | प्रतिनिधी |
तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थितीअभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज आठ ते नऊ किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी ‘पंखांना बळ देऊया’ या सदराखाली श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ महाडतर्फे 20 सायकली प्रदान करण्यात आल्या.
या विद्यार्थ्यांची समस्या संकल्प सेवा ग्रुप महाडचे प्रल्हाद ठाकूर यांनी रोटरी क्लब ऑफ महाडला सांगितली. शाळा दुर्गम भागात असून, विद्यार्थ्यांना आठ ते नऊ किलोमीटर पायी चालत येऊन शिक्षण घ्यावे लागत होते. कोणत्याही वाहनांची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ जाण्या-येण्यातच वाया जात होता, त्यासाठी या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब महाडच्या मार्फत सायकलींची मदत मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून जात होता.
रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. चेतन सुर्वे, पराग चांदे, राजाभाऊ मेहता, परेश शेठ, धनंजय तलाठी तसेच श्री. शीलवंत, श्री. मांडवकर, राहुल शेठ, डॉ. राहुल सुकाळे, माधुभाई मेहता, श्री. गुरव, सचिन सुकाळे, तुषार बुटाला, अक्षय आर्ते इत्यादी रोटरी क्लबचे पदाधिकारी व मेंबर्सने सायकलींसाठी आर्थिक वर्गणी गोळा करून पुण्याहून सायकली आणून विद्यार्थ्यांना प्रदान केल्या. कार्यक्रमाला वरील सर्व पदाधिकारी व मेंबर्स उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे राजीव वनारसे यांनी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांना सायकली प्रदान केल्याबद्दल शाळेचे चेअरमन महेंद्र म्हामूणकर तथा वरिष्ठ सहायक शिक्षक शैलेश काकडे, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.