कच्च्या रस्त्याने घेतला कामगाराचा बळी

माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन
प्रशासन, सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप

| नेरळ | प्रतिनिधी |

मोठा गाजावाजा करीत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे उद्घाटन झाले, पण प्रत्यक्षात रस्ता आजही कच्चाच आहे. परिणामी, त्याच निष्काळजीपणामुळे एका निरपराध कामगाराचा बळी गेला आहे. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या अपूर्ण रस्त्यामुळे सखाराम हाशा सांबरे यांचा मृत्यू झाल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आसलवाडी येथील सखाराम सांबरे हे माथेरान गिरी नगरपरिषदेमध्ये सफाई कामगार होते. कामावरून परतल्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेत असताना कच्च्या आणि अपूर्ण रस्त्यामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. अखेर अर्ध्या रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या रस्त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही रस्ता पूर्ण झाला नाही. उद्घाटनाचे फीत कापून फोटो काढण्यापुरतेच काम झाले, पण प्रत्यक्षात नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा उभा राहिला, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आजही अपूर्ण असून, अनेक वर्षांपासून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार आंदोलने, उपोषणे करूनही प्रशासनाने दुर्लक्षच केल्याचा आरोप होत आहे.

“फीत कापली, पण रस्ता दिला नाही; मग जबाबदार कोण?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. आणखी किती जीव गेल्यावर सरकार आणि प्रशासन जागे होणार, असा संतापजनक प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून, तातडीने रस्ता पूर्ण करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Exit mobile version