भ्रष्टाचारावरुन आरोपांच्या फैरी

सत्ताधारी,विरोधक आमनसामने
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील  सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या भाजपने किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करणे सुरु केले आहे. यावरुन गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांच्यात जोरदार आरोप, प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडल्या.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोप करण्यासाठी कोल्हापूरला निघालेल्या किरीट सोमय्यांना कराडमधूनच मुंबईला पाठविण्यात आले.त्यामुळे संतापलेल्या सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच टार्गेट करीत अलिबाग तालुक्यातील रश्मी ठाकरे यांनी खरेदी केलेल्या जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली.तसेच यापुढेही आपण असेच लढत राहणार असल्याचे जाहीर केले.

मुश्रीफांचे प्रत्युत्तर
  या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, मला सोमय्यांना एक प्रश्‍न विचारायचा आहे. तुम्ही एकदा तक्रार केली आहे. मग त्या तपास यंत्रणा तपास करतील की, तुम्ही कशाला पर्यटन करायला जाता? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असं म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला? यावर आक्षेप घेत मी उच्च न्यायालयात जाणार आहे. हे न्यायाधीश झाले का? तुम्हाला सुपारी दिलीये तर तुम्ही काम करा तुमचं, तक्रार करा. तपास यंत्रणांना तपास करु द्या. तुम्ही बदनामी का करत आहेत? अशी संतप्त विचारणाही मुश्रीफ यांनी केली.


आमच्यावर आत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, ते होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे ह्यात? त्यांचं नाव का घेतायत? त्यांचं नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव घेतायत हे. हे बोलण्यापासून त्यांना रोखण्यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार आहे.
हसन मुश्रीफ,ग्रामविकासमंत्री

चंद्रकांत पाटील संतप्त
 खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील आहेत असा आरोप केला आहे. किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे असे मुश्रीफ यांनी म्हटले होते. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Exit mobile version