उरण पोलीस ठाण्यातर्फे रूट मार्चचे आयोजन

। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये हिंसक आंदोलन आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. या प्रकारावर केंद्रीय गृहमंत्रालयानेही स्पष्टीकरण दिले आहे. त्रिपुरामध्ये मशिदीला कुठल्याही प्रकारे नुकसान अथवा तोडफोड झाली नाही. सोशल मीडियावर पसरवण्यात येणार्‍या बातम्या चुकीच्या आणि बनावट आहेत. सोशल मीडियावरून लोकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनीही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.
सध्या महाराष्ट्रात उद्भवलेल्या जातीय घटनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2,सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस परिस्थिती सांभाळण्यासाठी समर्थ असून सतर्क आहेत आणि जनतेमध्ये तसा संदेश देण्यासाठी पोर्ट विभागातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मार्फत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रूट मार्च उरण चार फाटा बस डेपो येथून सुरु करून ते राजपाल नाका, मस्जिद मोहल्ला, महात्मा गांधी पुतळा, वैष्णवी हॉटेल, एनएमएमटी बस स्टॉप येथे सांगता करण्यात आली. सदर रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग 2, पोलीस निरीक्षक, 7, पोलीस अधिकारी आणि 38 महिला व पुरुष अंमलदार आदी उपस्थित होते.

Exit mobile version