रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विजयी

बंगळूर : पंजाब किंग्सला पराभूत केल्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने घरच्या मैदानावर झालेल्या आयपीएल लढतीत राजस्थान रॉयल्सवर 7 धावांनी मात करीत आपली विजयी वाटचाल कायम राखली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा हा चौथा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सला मात्र तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले.

फाफ ड्युप्लेसी (62 धावा), ग्लेन मॅक्सवेल (77 धावा) यांची शानदार फलंदाजी व हर्षल पटेल (3/32) याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने विजय साकारला. मॅक्सवेलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

बंगळूरकडून राजस्थानसमोर 190 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर फॉर्ममध्ये असलेला जॉस बटलर शून्यावरच त्रिफळाचीत झाला. यशस्वी जयस्वाल व देवदत्त पडीक्कल या जोडीने 98 धावांची भागीदारी करताना राजस्थानच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या.

त्यानंतर डेव्हिड विली याने देवदत्तला बाद करीत मोठा अडसर दूर केला. देवदत्तने 52 धावांची खेळी 7 चौकार व 1 षटकाराने सजवली. यशस्वीने आपला चांगला फॉर्म या लढतीत कायम ठेवला; पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. 37 चेंडूंमध्ये 47 धावा करून तो बाद झाला. हर्षल पटेलने त्याला विराट कोहलीकरवी झेलबाद केले.

कर्णधार संजू सॅमसन (22 धावा) व शिमरॉन हेटमायर (3 धावा) या अनुभवी व भरवशाच्या खेळाडूंना चमक दाखवता आली नाही. निर्णायक क्षणी त्यांना फलंदाजीत आपला खेळ उंचावता आली नाही. ध्रुव जुरेल याने नाबाद 34 धावा करताना विजयासाठी झुंज दिली; पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. रविचंद्रन अश्‍विनने 12 धावांची आश्‍वासक खेळी केली. हर्षलने 32 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. राजस्थानला 182 धावांपर्यंतच मजल मारता आली.

राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर विराट कोहली याला पायचीत केले. विराटने याआधी चार अर्धशतके झळकाविली होती. तसेच त्याच्या बॅटमधून यंदाच्या मोसमात 279 धावा फटकावल्या होत्या.

त्यामुळे बोल्टने पहिल्याच चेंडूवर टिपलेला हा विकेट महत्त्वपूर्ण ठरला. याचसह त्याने आयपीएलमध्ये 100 विकेटही पूर्ण केले. त्यानंतर बोल्टनेच शाहबाज अहमद याला 2 धावांवर बाद केले. त्यामुळे बंगळूरची अवस्था 2 बाद 12 धावा अशी झाली.

बंगळूरचा संघ संकटात असताना ड्युप्लेसी व मॅक्सवेल या जोडीने 127 धावांची दमदार भागीदारी रचली. ड्युप्लेसीने 39 चेंडूंमध्ये 62 धावांची खेळी करताना 8 चौकार व 2 षटकार मारले. मॅक्सवेल याने 44 चेंडूंमध्ये 77 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार व 4 षटकार मारले. यशस्वीच्या अचूक थ्रोवर ड्युप्लेसी धावचीत झाला.

अश्‍विनच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलचा झेल जेसन होल्डरने टिपला. बंगळूरच्या फलंदाजांना अखेरच्या षटकांमध्ये म्हणावी तशी चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे बंगळूरला 20 षटकांत 9 बाद 189 धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक ः रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 20 षटकांत 9 बाद 189 धावा (फाफ ड्युप्लेसी 62, ग्लेन मॅक्सवेल 77, दिनेश कार्तिक 16, ट्रेंट बोल्ट 2/41, संदीप शर्मा 2/49) विजयी वि. राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 बाद 182 धावा (यशस्वी जयस्वाल 47, देवदत्त पडीक्कल 52, संजू सॅमसन 22, ध्रुव जुरेल नाबाद 34, हर्षल पटेल 3/32).

Exit mobile version