| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांना झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी कर्जत आरपीआय आठवले पक्षाच्यावतीने निवेदन देऊन हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रथमेश कुडेकर यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी कर्जत-चौक मार्गावर कृषी संशोधन केंद्राच्या समोर अज्ञात हल्लेखोरांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांना गंभीर इजा झाली. या घटनेच्या निषेधार्थ कर्जत आरपीआयच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला असून या हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करण्यात यावी. नाहीतर कर्जत पोलीस स्टेशन समोर तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशारा देणारे निवेदन कर्जत पोलिसांना देण्यात आले आहे. हे निवेदन कर्जतचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांनी स्वीकारले.
आरपीआयकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
