पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रिक्षा परमिट नावावर करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारणारा आरटीओ एजंट जाळ्यात सापडला. नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 1) पनवेल येथील खारघर आरटीओ कार्यालयासमोर लाच घेताना रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास सनगर असे या आरोपीचे नाव आहे. हा इसम पनवेल येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट म्हणून काम करतो. तक्रारदाराला अधिकारपत्राप्रमाणे रिक्षा परमिट नावावर करायचे होते. त्यासाठी आरटीओ एजंट विलास सनगर यांची भेट घेतली. कागदपत्रे दाखवून रिक्षा परमिट नावावर करण्यासाठी शासकीय शुल्क 25 हजार 700 रुपये असून वरती स्वतःसाठी आणि लोकसेवक यांच्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी पडताळणी सुुरू केली. पथकामार्फत चौकशी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. अखेर मंगळवारी (दि.1) पनवेल येथील खारघरमधील आरटीओ कार्यालयाखाली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लाच घेताना विलास सनगर यांना रंगेहाथ पकडले. धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निता भोसले, पोलीस हवालदार पठाण, महिला पोलीस हवालदार छाया शिंदे, पोलीस नाईक विशाल अहिरे यांनी कारवाई केली.

Exit mobile version