अवैध वाहतूकीवर आरटीओची नजर

रस्ता सुरक्षिततेअंतर्गत मोहीम; दोन दिवसांत 12 खासगी बसवर कारवाई

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

खासगी बसेस मधून होणाऱ्या अवैध वाहतुकिला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओकडून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक 16 मे ते 30 मे पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून या अंतर्गत अवैध माल वाहतूक, वाहन विमा, वाहन योग्यता प्रमाणपत्र, विना परवाना असलेल्या खासगी बसवर कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसात 12 खासगी बसवर कारवाई केली आहे. अशी माहिती वाशी उपप्रादेशिक परीवहनाने दिली आहे.

आजही शहरात काही वाहने परवाना, फिटनेस, इन्शुरन्स व पीयुसी नसताना नियमबाह्यपणे चालविली जात आहेत. अनेकदा खासगी बसमधून प्रवासी वाहतुकीबरोबर व्यसायिक मालवाहतुकही केली जाते. खासगी बसेस या प्रवासी वाहतुकीसाठी असून मालवाहतुकीसाठी त्याचा वापर करणे नियमात नसतानाही अनधिकृतरित्या मालवाहतूक केली जाते. आरटीओकडून वर्षभर यावर कारवाई सुरूच असते, मात्र तरीही जैसे थेच परिस्थिती पहावयास मिळते. त्यामुळे परिवहनाने जाहीर केलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत शहरातील अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच पुढेही अवैध वाहतूक आढळल्यास परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली आहे.

रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने दोन आठवडे शहरात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये अवैध माल वाहतूक , वाहन विमा,वाहन योग्यताप्रमाणपत्र, विना परवाना, पीयुसी नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत 12 बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेमांगी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी
Exit mobile version