महामार्गावरील रंबल स्ट्रीप बिनकामाचे

ग्रामस्थांचे म्हणणे, प्रशासनास विचारला जाब

| पाली | वार्ताहर |

पाली-खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेषतः लेक सिटी चिवे ते आंबोले गावादरम्यान अनेक अपघात होऊन निष्पाप जीव गेले आहेत. या ठिकाणी रंबल स्ट्रिप बसविण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.22) येथे रंबल स्ट्रिप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, हे रंबल स्ट्रिप पातळ असून, बिनकामाचे आहेत, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावरून गुरुवारी (दि.23) ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

वावे गावातील केतन म्हसके यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तसेच सुधागड तहसीलदार यांच्याकडे येथे रंबल स्ट्रिप बसविण्यासाठी तक्रारी अर्ज केले होते. त्याचीच दखल घेऊन बुधवारी (दि.22) येथे रंबल स्ट्रिप बसविण्याचे काम सुरु झाले. परंतु, इतर मार्गावर जशा रंबल स्ट्रिप असतात की ज्यामुळे स्पीड नियंत्रणात येतो, तशा या रंबल स्ट्रिप होताना दिसत नाहीत. यासंदर्भात केतन म्हसके यांनी एमएसआरडीसी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्याची संख्या सहा पट्ट्यांवरून 10 किंवा 12 करायला व जाडी 12.5 एमएम करायला सांगितली. पण ती झाली नाही. आता ज्या पट्ट्या बनविल्या आहेत, या रंबल स्ट्रिपवरून वाहन नेल्यावर आपल्या पोटातील पाणीसुद्धा हालत नाही, मग या पट्ट्यांचं काम काय? या रंबल स्ट्रिप केवळ रस्त्याला रंग मारण्याच्या हेतूने बनविल्या आहेत का? तसेच महामार्ग यावर गतिरोधक नसतात, मग पालीमध्ये प्रवेश करताना 8 गतिरोधक आहेत. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उत्तमरित्या रंबल स्ट्रिप आहेत. याबद्दल एमएसआरडीसीचे काय म्हणणे आहे, अशी विचारणा ग्रामस्थांच्यावतीने केतन म्हसके केली आहे.

मी अगोदरच रंबल स्ट्रिप टाकायला तसेच स्ट्रिप आणि त्याची जाडी वाढवायला सांगितले आहे. तसेच, हे सर्व काम एका टप्प्यामध्ये होत नाही. ते दोन टप्प्यांमध्ये योग्यप्रकारे पूर्णपणे होऊन जाईल.

सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
Exit mobile version