विश्वास न ठेवण्याचे सिडकोचे आवाहन
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
सिडको महामंडळातर्फे येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त हे निराधार असून, अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. केवळ सिडकोद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच याबाबत नागरिकांनी विश्वास ठेवावा, असे सिडकोकडून कळविण्यात येत आहे.
सिडकोकडून नुकताच 26 जानेवारी 2022 रोजी नव्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वेगाने विकसित होत असलेल्या तळोजा नोडमध्ये 5,730 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे आणि सिडकोचा मेट्रो प्रकल्प, यांमुळे या नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. एकूण 5,730 घरांपैकी 1,524 घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि उर्वरित 4,206 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. या योजनेकरिता 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभून आतापर्यंत 10 हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोने केले आहे.
सिडको महामंडळ सातत्याने आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देत असते. आपल्या नव्याने येणाऱ्या गृहनिर्माण योजनांची माहिती सिडकोकडून जाहिरात व अन्य माध्यमांद्वारे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येते. यामुळे नागरिकांनी या संदर्भात सिडकोद्वारे प्रसारित करण्यात येणारी प्रसिद्धी पत्रके, सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक, युट्यूब आणि ट्विटरवरील सिडकोचे अधिकृत पेज यांद्वारे देण्यात येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. तसेच लवकरच वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात येणार असल्याचेही सिडकोकडून कळविण्यात आले आहे.