| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा जेल परिसरातील खुटुक बांधण गावाजवळ बिबट्या असल्याचा एक व्हिडिओ पहाटेपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांनी याबाबत तात्काळ खारघर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी, खारघर पोलीस तसेच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी व्हिडिओ व घटनास्थळाची सखोल पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर वन विभाग अधिकाऱ्यांना संबंधित व्हिडिओ फेक असल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्ष घटनास्थळी बिबट्याचा कोणताही वावर अथवा ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण काही अंशी निवळले आहे. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी गजानन पानपट्टे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा फेक व्हिडिओंवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कुठेही संशयास्पद प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, अफवा पसरवू नयेत. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अफवांमुळे घबराट न पसरवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







