| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील विविध भागांमध्ये बिबट्या आढळल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सातत्याने व्हायरल होत आहेत. कधी एका जंगलात तर कधी दुसऱ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आज वनविभागाने या सर्व अफवांबाबत अधिकृत स्पष्टीकरण देत रोहा तालुक्यात अद्याप कुठेही बिबट्या आढळलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
वनविभागाकडून माहिती देताना सांगण्यात आले की, सध्या सोशल मीडियावर फिरत असलेले फोटो व संदेश हे खोटे व दिशाभूल करणारे आहेत. विशेषतः खारी येथील असल्याचे सांगत जो फोटो व्हायरल झाला, तो एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला असून, तो व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर सायबर गुन्हे सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वनविभागाचे मुख्य अधिकारी दबडे यांनी दिली.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना योग्य दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन करत सांगितले की, बिबट्या आढळणे ही भीतीची नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्या सकारात्मक बाब आहे. बिबट्याची उपस्थिती म्हणजे निसर्गातील अन्नसाखळी व जैवविविधतेचे संवर्धन टिकून असल्याचे द्योतक असून वन्यजीवांचे संरक्षण अधिक सक्षम असल्याचे सूचित करते. तसेच, रोहा तालुक्यातील ऐनवल येथे बैलाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याची बातमीही व्हायरल झाली होती. मात्र, या घटनेत बिबट्याचा सहभाग असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, अशी माहिती वनविभागाने दिली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित शेतकऱ्याला वनविभागाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतेही अप्रमाणित फोटो किंवा संदेश पुढे पाठवू नयेत. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.






